सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयिताचा नवा फोटो; आरोपीमागे मोठी टोळी?; ५० लोक रडारवर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:43 IST2025-01-18T09:42:05+5:302025-01-18T09:43:15+5:30

१४ जानेवारीच्या रात्री २.४२ मिनिटांनी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यातही एका संशयिताने घुसण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला. कदाचित हा एकच व्यक्ती असू शकतो असंही पोलिसांना वाटते. 

Saif Ali Khan Attack Update: New photo of the suspect who attacked Saif Ali Khan; Is there a large gang behind the accused?; Police questioned 50 people | सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयिताचा नवा फोटो; आरोपीमागे मोठी टोळी?; ५० लोक रडारवर..

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयिताचा नवा फोटो; आरोपीमागे मोठी टोळी?; ५० लोक रडारवर..

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी मध्यरात्री घरात घुसून जीवघेणा हल्ला झाला. सैफ अली खानवर चाकूचे ६ वार करण्यात आले. त्यात तो गंभीर जखमी झाला. सैफच्या मानेवर, पाठीवर आणि हातासह इतर ठिकाणी जखमा झाल्या. मुंबईच्या लिलावती रुग्णालयात सैफवर तातडीने सर्जरी करण्यात आली. सध्या सैफची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला घरी सोडण्यात येईल. सैफवरील हल्ल्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. पोलिसांनी या हल्ल्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी ३५ हून अधिक टीम बनवल्या असून एका संशयितालाही ताब्यात घेतले आहे.

तपासात पोलिसांना माहिती मिळाली आहे की, आरोपीने हल्ल्यानंतर त्याची ओळख लपवण्यासाठी कपडे बदलले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे समोर आले. एक संशयित मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशन आणि रेल्वे स्टेशन यामध्ये दिसून आला. आतापर्यंत ३ सीसीटीव्ही फुटेज पुढे आलेत ज्यात आरोपीचा चेहरा दिसत आहे. पहिल्या फुटेजमध्ये आरोपी दबक्या पावलांनी घरात घुसताना दिसतो. दुसऱ्या व्हिडिओत तो घरातून जाताना दिसतो आणि तिसऱ्या फुटेजमध्ये आरोपीने ओळख लपवण्यासाठी कपडे बदललेले दिसतात. 

सूत्रांच्या माहितीनुसार, संशयित सराईत गुन्हेगार वाटत नाही. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सापडला नाही, ना कोणत्या कुटुंबाची अथवा मित्रांची माहिती मिळाली आहे. पोलिसांना चकमा देण्यासाठी त्याने कपडे बदललेत. तो एखाद्या क्राइम वेबसीरीज अथवा क्राइम मूव्हीने प्रभावित झाल्याचं वाटते. आरोपीने वांद्रे रेल्वे स्टेशनहून लोकल अथवा एक्सप्रेसने ट्रेन पकडून मुंबईच्या आसपास किंवा बाहेर गेल्याचा संशय आहे. मुंबई पोलिसांची टीम लोकल आणि एक्सप्रेस स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत आहे. 

दरम्यान, सैफ अली खान हल्ला प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी ४० ते ५० लोकांची चौकशी केली आहे. संशयित ३५-४० वयाचा होता. त्याचा रंग सावळा, सडपातळ शरीरयष्टी, उंची सुमारे ५ फूट ५ इंच होती. डोक्यावर टोपीसह गडद रंगाचा पॅन्ट आणि शर्ट घातला होता. घुसखोर व्यक्तीने सैफ अली खानच्या सर्वात लहान मुलगा जहांगीरच्या खोलीत प्रवेश केला. महिला मदतनीसने त्याला पाहिले आणि आरडाओरड सुरू केला. या आरोपीने १ कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे १४ जानेवारीच्या रात्री २.४२ मिनिटांनी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यातही एका संशयिताने घुसण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला. कदाचित हा एकच व्यक्ती असू शकतो असंही पोलिसांना वाटते. 

Web Title: Saif Ali Khan Attack Update: New photo of the suspect who attacked Saif Ali Khan; Is there a large gang behind the accused?; Police questioned 50 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.