रिंकू राजगुरूने 'मॉडर्न डेटिंग' आणि 'लिव्ह-इन'वर मांडली रोखठोख भूमिका, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:04 IST2025-12-24T18:04:16+5:302025-12-24T18:04:41+5:30
रिंकूने आजच्या काळातील 'मॉडर्न डेटिंग', 'लिव्ह-इन रिलेशनशिप' आणि 'सिच्युएशनशिप' या विषयांवर आपले स्पष्ट मत मांडले आहे.

रिंकू राजगुरूने 'मॉडर्न डेटिंग' आणि 'लिव्ह-इन'वर मांडली रोखठोख भूमिका, म्हणाली...
Rinku Rajguru Opinion On Live-in-Modern Dating : महाराष्ट्राची लाडकी 'आर्ची' अर्थात रिंकू राजगुरू ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. रिंकूची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. रिंकू सध्या तिच्या आगामी 'आशा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत रिंकूने आजच्या काळातील 'मॉडर्न डेटिंग', 'लिव्ह-इन रिलेशनशिप' आणि 'सिच्युएशनशिप' या विषयांवर आपले स्पष्ट मत मांडले आहे.
रिंकूनं नुकतंच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी तिला आजकाल सिच्युएशनशिप, लिव्ह-इन रिलेशनशिप असे बरेच रिलेशनशिपचे प्रकार आहेत. अशाच मॉडर्न डेटिंगबद्दल तुला काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रिंकू म्हणाली, "मला हे नाही आवडत म्हणजे वैयक्तिकरीत्या. मला असं वाटतं की, तुम्ही कुठल्याही माणसाला त्या नात्यात घेता, तेव्हा ट्राय करू आणि चार महिने राहून बघू, असं नाही करू शकत. कारण, आपण भावनिकदृष्ट्या माणसांमध्ये गुंतत असतो".
लिव्ह-इनमध्ये राहून एकमेकांना ओळखण्याचा ट्रेंड आहे. मात्र रिंकूने याला वेगळ्या नजरेतून पाहिले आहे. ती पुढे म्हणाली, "माझं असं मत आहे की, जर तुम्ही त्या माणसाची आयुष्यभर जबाबदारी घेणार असाल, तरच त्या माणसाकडे जा. तुमची जर ती क्षमता नसेल, तर तुम्ही त्यात पडूच नका. सुरुवातीलाच सगळ्या गोष्टींबाबत स्पष्ट राहा".
दरम्यान, अलिकडेच रिंकूचा 'आशा' हा सिनेमा नुकताच १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका रिंकूने साकारली आहे. या सिनेमासाठी रिंकूला राज्य शासनाचा सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.