"विमान खाली उतरल्यावर अचानक...", रणबीर कपूरची बहीण रिद्धिमाला आला भयावह अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:26 IST2025-11-19T13:25:29+5:302025-11-19T13:26:11+5:30
अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनीला नुकताच विमानात भयावह अनुभव आला.

"विमान खाली उतरल्यावर अचानक...", रणबीर कपूरची बहीण रिद्धिमाला आला भयावह अनुभव
अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनीला नुकताच विमानात भयावह अनुभव आला. तिने सोशल मीडियावर तो शेअर केला. रिद्धिमासोबत तिची लेक समाराही होती. गेल्या काही दिवसात अनेक विमान दुर्घटना ऐकिवात आल्या. अशातच काही सेकंदांसाठी रिद्धिमाही घाबरली. तिने देवाचे आभार मानले. नक्की काय घडलं हे तिने सविस्तर इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिलं आहे.
रिद्धिमा कपूर साहनीने लिहिले,"शुक्राना गुरुजी, आज मला आणि मुलीला असा काही अनुभव आला जो आम्ही कधीच विसरु शकत नाही. आमचं विमान जमिनीवर आलं आणि अचानक त्याने पुन्हा आकाशात भरारी घेतली. त्या काही सेकंदांसाठी आमच्या दोघींचा श्वासच थांबला होता. मी लेकीचा हात घट्ट धरला तेव्हा तिने माझ्याकडे घाबरतच पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती आणि तिच्यासाठी मी स्ट्राँग राहणं एवढंच माझ्या हातात होतं."
ती पुढे लिहिते, "काही क्षणासाठी आम्ही धक्क्यात होतो. सुदैवाने आम्ही सुरक्षित आहोत आणि हेच महत्वाचं आहे. अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला हलवून टाकतो पण सोबतच तुमचं आयुष्य किती अनमोल आणि नाजूक आहे याचीही जाणीव करुन देतो.
काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद-लंडन एअर इंडिया विमानाची मोठी दुर्घटना झाली होती. त्यात सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला. फक्त १ प्रवासी बचावला होता. यानंतर अनेकांन विमान प्रवासाचा धसकाच घेतला. रिद्धिमालाही या छोट्या अनुभवाने मोठा धक्का बसला.