wagherya movie review : वाघोबा आला रे आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST2018-05-17T10:48:44+5:302023-08-08T19:16:16+5:30
भारत गणेशपूरे, किशोर चौघुले, किशोर कदम, ऋषिकेष जोशी यांच्या वाघेऱ्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
.jpg)
wagherya movie review : वाघोबा आला रे आला
एका गावात एका छोट्याशा गोष्टीवरून काय काय धमाल उडू शकते हे आपल्याला वाघेऱ्या या चित्रपटात पाहायला मिळते. एक गावकरी गावात वाघ पाहातो आणि त्यानंतर त्या वाघाला पकडण्यासाठी गावकरी काय करतात याची धमाल मस्ती म्हणजे वाघेऱ्या हा चित्रपट.
झोटिंग अण्णा (भारत गणेशपूरे) हा खोटे बोलण्यात पटाईत असतो. त्यामुळे त्याच्या कोणत्याही गोष्टीकडे गावकरी गांभीर्याने घेत नसतात. रात्रीच्या वेळात त्याला शांताराम (किशोर चौघुले)च्या उसाच्या शेतात एक वाघ दिसतो. वाघ दिसल्यानंतर अण्णा घाबरून घरी पळून जातो. अण्णाने गावात वाघ पाहिला ही गोष्ट हळूहळू करून गावाभर पसरते. सुरुवातीला त्याच्या या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवायला तयार नसते. पण नंतर गावाचे सरपंच (किशोर कदम) या वाघाला शोधण्याचे ठरवतात आणि या वाघाला शोधण्यासाठी ते गावातल्या लोकांना एकत्र करतात. वाघाला शोधण्यासाठी वनअधिकारी वाघमारे (ऋषिकेष जोशी)ला गावात बोलवण्यात येते. वाघमारेचे त्याच दिवशी लग्न झालेले असते. पण वरिष्ठांचा आदेश असल्याने लग्नाच्या मंडपातूनच तो तिथे पोहोचतो. मंडपातूनच थेट कामावर यायला लागले असल्यामुळे वाघमारेला सतत घरी जायची ओढ लागलेली असते. पण वाघ मिळेपर्यंत जायचे नाही असे त्याला सांगण्यात आलेले असते. वाघमारे गावातल्यांच्या मदतीने हा वाघ पकडायला यशस्वी होतो का? अण्णाने खरंच वाघ पाहिलेला असतो की त्याने नेहमीप्रमाणे थाप मारलेली असते याची उत्तरे प्रेक्षकांना वाघेऱ्या या चित्रपटात मिळणार आहेत.
वाघेऱ्या या चित्रपटाची कथा ही खूपच छान आहे. पण ती कथा दिग्दर्शक समीर आशा पाटीलला तितकीशी मांडता आलेली नाही. हा चित्रपट खूपच ताणला गेल्यासारखा वाटतो. ही कथा थोडक्यात मांडली असती तर ती अधिक प्रभावी झाली असती. चित्रपटात अनेक व्यक्तिरेखा असल्याने काही व्यक्तिरेखांना चित्रपटात वाव मिळालेला नाही. लीना भागवत, छाया कदम यांसारख्या खूपच चांगल्या कलाकारांच्या वाट्याला खूपच छोट्या भूमिका आल्या आहेत. पण तरीही त्यांनी त्यांची कामे चोख बजावली आहेत. किशोर कदम, भारत गणेशपूरे, हृषिकेश जोशी यांनी त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. शांतारामच्या भूमिकेतील किशोर चौघुले आणि पाटलाच्या भूमिकेत असलेले सुहास पळशीकर देखील नक्कीच लक्षात राहातात. पण चित्रपटात अनेक प्रसंग उगाचच टाकण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपट खूपच ताणला गेला आहे. चित्रपटाला म्हणावा तसा वेग नाहीये. तसेच चित्रपटातील गाणीदेखील ओठावर रुळत नाहीत. पण अनेक दृश्य पाहाताना आपल्याला नक्कीच खळखळून हसायला येते. तसेच चित्रपटाचे संवाद देखील चांगले जमून आले आहेत