Swatantrya Veer Savarkar Movie Review: सावरकरांच्या प्रत्यक्ष भेटीचा अनुभव, स्वातंत्र्यलढ्यातील धगधगता अध्याय; कसा आहे 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमा?

By ऋचा वझे | Published: March 22, 2024 01:25 PM2024-03-22T13:25:02+5:302024-03-22T16:14:34+5:30

Swatantrya Veer Savarkar Movie Review: वीर सावरकर यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर, जाणून घ्या कसा आहे सिनेमा

Swatantrya Veer Savarkar hindi Movie review starring Randeep hooda | Swatantrya Veer Savarkar Movie Review: सावरकरांच्या प्रत्यक्ष भेटीचा अनुभव, स्वातंत्र्यलढ्यातील धगधगता अध्याय; कसा आहे 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमा?

Swatantrya Veer Savarkar Movie Review: सावरकरांच्या प्रत्यक्ष भेटीचा अनुभव, स्वातंत्र्यलढ्यातील धगधगता अध्याय; कसा आहे 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमा?

Release Date: March 22,2024Language: हिंदी
Cast: रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे, राजेश खेरा, अमित सियाल
Producer: आनंद पंडित, संदीप सिंहDirector: रणदीप हुड्डा
Duration: 2 तास 58 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

>> ऋचा वझे

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अखंड भारतासाठी दिलेला लढा आपण ऐकला आहे, वाचला आहे. मात्र त्यांची विद्वत्ता, माणूस म्हणून ते कसे होते आणि अखंड भारत त्यांच्या नसानसात कसा भिनला होता याची अनुभूती देणारा सिनेमा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांना आपण प्रत्यक्षात पाहतोय की काय असा अद्भुत अनुभव रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) अभिनय आणि दिग्दर्शनातून दिला आहे. 

कथानक-

वीर सावरकर यांची जीवनगाथा खूप मोठी आहे. त्यामुळे तीन तासात सिनेमाच्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर कथानक मांडणं हे खरोखरंच आव्हान होतं. दिग्दर्शक रणदीप हुड्डा ते पेलण्यात यशस्वी झाला आहे. १८५८ पासूनचा काळ, इंग्रजांची सत्ता, देशवासीयांना त्यांच्याकडून मिळणारी गुलामासारखी वागणूक, नागरिकांवर होत असलेले अत्याचार आणि त्यातून जन्माला आलेले अनेक वीर क्रांतिकारी. त्यातच होते विनायक दामोदर सावरकर. आपल्या वडिलांचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिल्यानंतर त्यांनी क्रांतिकारी होण्याची शपथच घेतली. गल्लोगल्ली आपले विचार पोहोचवत 'अभिनव भारत' ची स्थापना केली. यासाठी त्यांना लोकमान्य टिळक यांची मदत मिळाली. पण सावरकर केवळ आक्रमकच नव्हते, तर ते अतिशय हुशार होते. इंग्रजांना भारतातून पळवून लावण्यासाठी त्यांचाच कायदा शिकायला ते लंडनला गेले. तिथे त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा, मदनलाल धिंग्रा, मॅडम कामा यांची साथ लाभली. अभ्यास करत करत त्यांनी पुस्तक लिहिलं. इकडे भारतात त्यांच्या भावाने आणि इतर सहकाऱ्यांनी 'अभिनव भारत' धगधगतं ठेवलं. मग सुरू झाला सावरकरांचा लढा. इंग्रजांना त्यांच्या क्रांतीची चाहूल लागली आणि त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी ते पुरावे शोधू लागले. सावरकरांनी त्यांचाच कायदा त्यांनाच दाखवला. गांधी-सावरकर भेट,  समुद्रात उडी मारण्याचा सीन, अंदमानच्या सेल्युलर जेलमधील काळ्या पाण्याच्या शिक्षेचा तो काळ, दोन भावांची भेट आणि तिथून सुटका, रत्नागिरी जेलमध्ये रवानगी, तिथूनही सुटका, माफीनामा होता की नव्हता, अशा एकानंतर एक घटना प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या, प्रसंगी अंगावर शहारा आणणाऱ्या आहेत. 

'ने मजसी ने परत मातृभूमीला' या गाण्याच्या ओळींमधून सावरकरांना मायभूमीची येणारी आठवण, त्यांची तगमग सिनेमातून खूप छान दाखवण्यात आली आहे. काही ठिकाणी दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टी घेतली असल्याचंही नक्कीच जाणवतं. अनेक डायलॉग्स काही राजकीय पक्षांना खटकणारेही आहेत. तरी अखंड भारत, हिंदुत्व याची व्याख्या समजवून सांगणारे ते सावरकरच हेही लक्षात येतं. सावरकरांच्या विचारांवरून अनेकदा राजकारणात वाद होत असतात. त्यामुळे या सिनेमाकडे प्रोपगंडा सिनेमा म्हणूनही काही जण पाहत आहेत. मात्र, सावरकर ही एक क्रांतीकारी विचारधारा होती हे सिनेमा पाहून नक्कीच जाणवतं.

अभिनय -  वीर सावरकरांची भूमिका रणदीप हुड्डा अक्षरशः जगला आहे. प्रत्येक सीनमध्ये त्याने स्वत:ला झोकून दिलंय. शरीरयष्टीवर घेतलेली मेहनतही दिसून येते. अंकिता लोखंडेने यमुनाबाई म्हणजेच सावरकरांच्या पत्नीची भूमिका उत्तम साकारली आहे. सावरकरांच्या भावाच्या भूमिकेतील अमित सियाल लक्षात राहतात. अभिनेता राजेश खेरा गांधींच्या भूमिकेत शोभून दिसतो. 

दिग्दर्शन - रणदीप हुड्डाने या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. पहिलंच दिग्दर्शन आणि स्वातंत्र्यपूर्व काळ दाखवायचा म्हणजे आव्हानात्मक आहे. पण रणदीपने अभ्यासपूर्वक गोष्टी हाताळल्या आहेत. तरी काही तांत्रिक बाबींमध्ये चुका निघू शकतात. 

सकारात्मक बाजू - अभिनय, संवाद

नकारात्मक बाजू - बऱ्याच घडामोडी घडत असल्याने तीन तास खूप वाटतात, दोन भागात सिनेमा करता आला असता.

का पाहावा? रणदीपचा जबरदस्त अभिनय, वीर सावरकरांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर आणि गांधी-सावरकर या दोन विचारधारांमधील फरक समजण्यासाठी 'वीर सावरकर' सिनेमा पाहण्यासारखा आहे.

Web Title: Swatantrya Veer Savarkar hindi Movie review starring Randeep hooda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.