'हास्यजत्रा' फुलवणारा मंतरलेला वाडा, प्रसाद खांडेकरचा 'एकदा येऊन तर बघा' कसा आहे?

By संजय घावरे | Published: December 9, 2023 06:59 PM2023-12-09T18:59:46+5:302023-12-09T19:01:18+5:30

हा चित्रपट म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांची मोठ्या पडद्यावरील हास्य मैफल आहे.

prasad khandekar ekda yeun tar bagha marathi movie review | 'हास्यजत्रा' फुलवणारा मंतरलेला वाडा, प्रसाद खांडेकरचा 'एकदा येऊन तर बघा' कसा आहे?

'हास्यजत्रा' फुलवणारा मंतरलेला वाडा, प्रसाद खांडेकरचा 'एकदा येऊन तर बघा' कसा आहे?

Release Date: December 08,2023Language: मराठी
Cast: गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, तेजस्वीनी पंडीत, ओमकार भोजने, प्रसाद खांडेकर, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, वनिता खरात, रोहित माने, नम्रता संभेराव
Producer: परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक चौधरी, सेजल पेंटरDirector: प्रसाद खांडेकर
Duration: २ तास १५ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

हा चित्रपट म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांची मोठ्या पडद्यावरील हास्य मैफल आहे. त्यांच्या जोडीला गिरीश कुलकर्णी, तेजस्वीनी पंडीत हे दिग्गज कलाकार आणि एक मंतरलेला वाडा आहे. दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने या चित्रपटात सादर केलेल्या काहीशा उत्कंठावर्धक कथानकावर आणखी चांगला चित्रपट बनू शकला असता हे चित्रपट संपेपर्यंत सारखं जाणवत राहातं.

कथानक : श्रावण फुलंब्रीकर, त्याचे भाऊ फाल्गुन आणि कार्तिक, पत्नी रोहिणी आणि तिची बहिण अश्विनी यांची ही कथा आहे. अचानक त्यांना गावातील जमिनीसाठी लाखो रुपये मिळणार असल्याचं समजतं आणि ते गावी पोहोचतात. तिथे त्यांची भेट नूतनशेठशी होते. तो श्रावणला त्यांच्या वडिलोपार्जित वाडा विकत घेण्याची ऑफर देतो. नूतनला तिथे हॉटेल सुरू करायचं असतं. श्रावणला हॉटेलची कल्पना आवडते आणि तो नूतनकडूनच पैसे उधार घेऊन स्वत: हॉटेल सुरू करतो. नंतर त्या मंतरलेल्या वाड्यात काय घडतं ते सिनेमात आहे.

लेखन-दिग्दर्शन : हास्यजत्रेच्या पलिकडला आणि चित्रपटाच्या अलिकडला असं याचं वर्णन करता येईल. अखेरपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या काही रोमांचक तसेच मनोरंजक प्रसंगांची उणिव भासते. काही खुमासदार संवाद अनाहुतपणे हास्य फुलवतात. चित्रपट एकसंध वाटत नाही. एखादं स्कीट पाहावं तसा तो तुकड्या तुकड्यांमध्ये पाहिल्याचे जाणवते. क्लायमॅक्समध्ये ओढून ताणून पटकथा वाढवल्यासारखी वाटते. गुलाबी बाबाचा सुरुवातीला सुरू केलेला ट्रॅक क्लायमॅक्समध्ये घुसडून अनपेक्षित शेवट करण्याचा प्रयत्न केला आहे. नूतनचा काका व चुलत बहिणीचंही तसंच काहीसं आहे. नऊवारीत आलेली शूटर विशाखा सुभेदार हत्या करण्यासाठी गेटअप का बदलते हे समजत नाही. सात जणांचे प्राण जातात, पण पोलिस भलत्याच रंगात दिसतात. 'आली आली गं भागाबाई...' हे गाणं चांगलं झालं आहे. 

अभिनय : सर्वच कलाकारांनी चौफेर फटकेबाजी करत चोख कामगिरी बजावली आहे. गिरीश कुलकर्णीने साकारलेला श्रावण आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळा आहे. सयाजी शिंदेची भूमिका खूप छोटी असून, त्याचा खलनायकी रंग पाहायला मिळत नाही. तेजस्वीनी पंडीतने आपली व्यक्तिरेखा नेहमीच्या शैलीत साकारली आहे. ओमकार भोजनेने आपल्या संवादांमधील पंच चांगलेच कॅश केले आहेत. प्रसाद खांडेकर एक उत्तम अभिनेता आहे, पण दिग्दर्शनात उणिवा राहिल्या आहेत. नम्रता संभेरावने साकारलेली अश्विनी चांगली झाली आहे. भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, वनिता खरात, रोहित माने आदींनी छोट्या भूमिकांनाही न्याय दिला आहे. 

सकारात्मक बाजू : अभिनय, खुमासदार संवाद, गीत-संगीत, लोकेशन

नकारात्मक बाजू : कथानक, पटकथा, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी

थोडक्यात काय तर छोट्या पडद्यावरील हास्यजत्रेतील कलाकारांच्या टिमची धमाल मोठ्या पडद्यावर अनुभवायची असेल तर टायटलप्रमाणे हा चित्रपट एकदा जाऊन पाहायला हरकत नाही.

Web Title: prasad khandekar ekda yeun tar bagha marathi movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.