देशासाठी प्राणाची पर्वा न करणाऱ्या योद्ध्याचा लढा! वाचा जॉन अब्राहमच्या 'तेहरान'चा रिव्ह्यू

By संजय घावरे | Updated: August 16, 2025 17:04 IST2025-08-16T17:03:44+5:302025-08-16T17:04:12+5:30

देशासाठी प्राणाची पर्वा न करता लढूनही प्रकाशझोतात न आलेल्या तसेच कौतुकाची थाप मिळण्याऐवजी काळोख्या दरीत हरवलेल्या नायकाची गोष्ट या चित्रपटात आहे. जॉन अब्राहमचा हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे.

john abraham manushi chhillar tehran patriotic hindi movie review | देशासाठी प्राणाची पर्वा न करणाऱ्या योद्ध्याचा लढा! वाचा जॉन अब्राहमच्या 'तेहरान'चा रिव्ह्यू

देशासाठी प्राणाची पर्वा न करणाऱ्या योद्ध्याचा लढा! वाचा जॉन अब्राहमच्या 'तेहरान'चा रिव्ह्यू

Release Date: August 14,2025Language: हिंदी
Cast: जॅान अब्राहम, मानुषी छिल्लर, नीरू बाजवा, मधुरीमा तुली, अली खान, एलनाज नौरोजी
Producer: दिनेश विजन, शोभना यादव, संदीप लेज़ेलDirector: अरुण गोपालन
Duration: १ तास ५५ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

देशासाठी प्राणाची पर्वा न करता लढूनही प्रकाशझोतात न आलेल्या तसेच कौतुकाची थाप मिळण्याऐवजी काळोख्या दरीत हरवलेल्या नायकाची गोष्ट या चित्रपटात आहे. सत्य घटनेवर आधारलेल्या दिग्दर्शक अरुण गोपालन यांच्या या चित्रपटात जॅान अब्राहमचा बदललेला अंदाज लक्ष वेधून घेतो. हे कॅरेक्टर त्या सर्व अनामिक नायकांना वाहिलेली जणू आदरांजली आहे.

कथानक : ईराण आणि इज्राईलमध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू असते. ईराणचा न्यूक्लीअर प्रोग्राम उद्ध्वस्त करण्यासाठी इज्राईल त्याच्याशी निगडीत असलेल्या काही लोकांची हत्या करतो. त्या विरोधात ईराण १३ फेब्रुवारी २०१२ रोजी इज्राईलच्या राजदूतावर बाॅम्बहल्ला करतो. या हल्ल्यात एका निरागस लहान मुलीचा मृत्यू होतो. डीसीपी राजीव कुमार म्हणजेच आरके तिच्या धाकट्या भावाच्या पालणपोषणाची जबाबदारी स्वीकारतो. बॅाम्बस्फोटाच्या तपासाचे धागेदोरे आरकेला तेहरानपर्यंत घेऊन जातात. त्यानंतर राजकीय तणाव आणि भावनिक गुंतागुंतीत नायकाने केलेली कामगिरी चित्रपटात आहे. 

लेखन-दिग्दर्शन : चित्रपट सुरू झाल्यापासूनच वास्तवदर्शी असल्याची जाणीव होते. कुठेही फिल्मी स्टाईल अॅक्शन किंवा दृश्ये नाहीत. कधीही प्रकाशझोतात न आलेल्या एका अशा हुषार पोलस अधिकाऱ्याची ही गोष्ट आहे. याच्या यशावर देशाने कधी कौतुक केले नाही. याउलट त्याच्या अपयशाकडे बोट दाखवत कधीच त्याला साथ दिली नाही. मुद्देसूद पटकथेला अर्थपूर्ण संवादांची साथ लाभली आहे. लेखनामुळे बऱ्याच त्रुटी झाकल्या गेल्या आहेत. कथा तेहरानमध्ये पोहोचल्यावर फारसीतील कॅप्शन वाचत चित्रपट पाहताना कथेशी कनेक्शन काहीसे तुटल्यासारखे वाटते. हिंदी डबसोबत कॅप्शन द्यायला हवी होती. पोलिसांवरील दबाव, कामाचा तणाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या, अंतर्गत राजकारण, आंतरराष्ट्रीय भूमिकांसह बरेच मुद्दे बारकाईने सादर करण्यात आले आहेत. 

अभिनय : या चित्रपटात जॅान अब्राहमचे अतिशय वेगळे रूप पाहायला मिळते. कुठेही अतिशयोक्ती न करता जॅानने आपल्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. मानुषी छिल्लरची व्यक्तिरेखा लांबलचक नसली तरी तिने उत्तम काम केले आहे. मानुषीची एक्झीट मनाला चटका लावते. नीरू बाजवानेही आपल्या वाट्याला आलेली व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे साकारली आहे. एलनाज नौरोजीच्या रूपातील लैलाही चांगली झाली आहे. चित्रपटाची बरीचशी कथा तेहरानमध्ये घडणारी असून, तिथल्या कलाकारांनीही चांगली साथ दिली आहे. 

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, सादरीकरण
नकारात्मक बाजू : संकलन, फारसी भाषा
थोडक्यात काय तर वास्तव चित्र दाखवताना कुठेही अतिशयोक्ती न करता पद्धतशीरपणे अनामिक नायकाने दिलेला हा लढा एकदा पाहायला हवा.

Web Title: john abraham manushi chhillar tehran patriotic hindi movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.