विज्ञान, श्रद्धा आणि मिथकांचा संगम! कसा आहे सोनाक्षी सिन्हाचा 'जटाधरा' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
By संजय घावरे | Updated: November 7, 2025 15:14 IST2025-11-07T15:14:10+5:302025-11-07T15:14:58+5:30
अलीकडच्या काळात बनणारे सुपरनॅचरल चित्रपट रसिकांचे लक्ष वेधत आहेत. विज्ञान, श्रद्धा आणि मिथकांचा रंजक संगम असलेला 'जटाधरा' खूप भीतीदायक नसला तरी विचार करायला भाग पाडणारा आहे. वेंकट कल्याण आणि अभिषेक जायसवाल दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे सोनाक्षी सिन्हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दाखल झाली आहे.

विज्ञान, श्रद्धा आणि मिथकांचा संगम! कसा आहे सोनाक्षी सिन्हाचा 'जटाधरा' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
अलीकडच्या काळात बनणारे सुपरनॅचरल चित्रपट रसिकांचे लक्ष वेधत आहेत. विज्ञान, श्रद्धा आणि मिथकांचा रंजक संगम असलेला 'जटाधरा' खूप भीतीदायक नसला तरी विचार करायला भाग पाडणारा आहे. वेंकट कल्याण आणि अभिषेक जायसवाल दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे सोनाक्षी सिन्हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दाखल झाली आहे.
कथानक : आत्मे आणि भूताखेतांवर विश्वास नसलेल्या घोस्ट हंटर शिवाच्या गोष्टीला या चित्रपटात रहस्यमयी पिशाच्च बंधनाची जोड देण्यात आली आहे. हे बंधन पुरातन अनंत पद्मनाभ स्वामी मंदिरातील खजिन्याचे रक्षण करण्यासाठी बनलेले आहे. लोभापोटी जर कोणी पिशाच्च बंधन तोडून खजिन्याच्या मागे गेला, तर धन पिशाचिनी जागृत होऊन त्याला शिक्षा देते. शिवा जेव्हा पिशाच्च बंधनाच्या गूढ विश्वात शिरतो, तेव्हा त्याला वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतोच, पण हळूहळू काही गोष्टींचा उलगडाही होत जातो.
लेखन-दिग्दर्शन : संकल्पना चांगली आणि वेगळी असून, पटकथा नाट्यमय वळणांची आहे. सुरुवातीला चित्रपटाची गती थोडी संथ असली तरी मध्यंतरानंतर वेगवान आहे. हळूहळू उलगडणारे रहस्यांचे पदर उत्सुकता वाढवण्याचे काम करतात. यातील शिव-तांडव स्तोत्र छान रंगले आहे. यासोबतच पुरातन मंदिरातील दृश्येही चांगली झाली आहेत. शेवटपर्यंत चित्रपट वेगवेागळ्या रहस्यांवरून पडदा उठवतो. आधुनिक विचारसरणी आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. मंदिरांमधील वातावरणनिर्मिती आणि सिनेमॅटोग्राफी चांगली आहे.
अभिनय :सोनाक्षी सिन्हाचे आजवर कधीही न पाहिलेले रूप या चित्रपटात असून, तिने आपल्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय दिला आहे. मुख्य भूमिकेतील सुधीरबाबूनेही आपली व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे साकारली असून, कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याची काळजी घेतली आहे. दिव्या खोसलाची भूमिकाही खूप वेगळी असून, त्यात तिने अतिशय शांतपणे रंग भरले आहेत. बऱ्याच वर्षांनी शिल्पा शिरोडकरला मोठ्या पडद्यावर पाहणे हे रसिकांसाठी सरप्राइज पॅकेज आहे. इतर कलाकारांनी चांगली साथ केली आहे.
सकारात्मक बाजू : संकल्पना, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, वातावरण निर्मिती, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : सुरुवातीची संथ गती, काही त्रुटी
थोडक्यात काय तर सुपरनॅचरल चित्रपटांच्या चाहत्यांचे लक्ष वेधणारा हा चित्रपट आस्था, भीती आणि जादूटोण्याचा संगम अनुभवण्यासाठी एकदा पाहायला हवा.