डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन म्हणजे लाखमोलाचे डोळस ध्यासपर्व...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:28 IST2018-01-12T07:49:49+5:302023-08-08T19:28:38+5:30
प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचे कार्य अफाट आहे आणि त्याला सामाजिक बांधिलकीची डूब असल्याने या कार्याला आगळे परिमाण प्राप्त झाले आहे. त्यांचे हे कार्य चित्रपटातून मांडणे हे तसे धाडसाचेच काम आणि वेळेच्या मर्यादेत हा अफाट पसारा बांधणे हेही जिकिरीचे काम आहे.

डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन म्हणजे लाखमोलाचे डोळस ध्यासपर्व...!
प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचे कार्य अफाट आहे आणि त्याला सामाजिक बांधिलकीची डूब असल्याने या कार्याला आगळे परिमाण प्राप्त झाले आहे. त्यांचे हे कार्य चित्रपटातून मांडणे हे तसे धाडसाचेच काम आणि वेळेच्या मर्यादेत हा अफाट पसारा बांधणे हेही जिकिरीचे काम आहे. विराग वानखेडे याने मात्र हे काम कौशल्याने पूर्ण करून 'डॉ. तात्या लहाने' हा चित्रपट निर्माण केला आहे. डॉ. तात्याराव लहाने यांचा हा चरित्रपट असला तरी तो माहितीपटाच्या पातळीवर शक्यतो उतरणार नाही याची खबरदारी घेतल्याने, लाखमोलाच्या डोळस ध्यासपर्वाची अनुभूती या चित्रपटातून येते.
हलाखीत गेलेले बालपण, गरिबीचे बसणारे चटके अशा प्रतिकूल परिस्थितीतही, शाळकरी तात्यांनी घेतलेल्या शिक्षणाच्या ध्यासापासून त्यांच्या आयुष्याचे रेखाटन चित्रपटात सुरु होते. केवळ जिद्दीच्या जोरावर युवादशेतले तात्या पुढे शिक्षण घेत जातात आणि डॉक्टर होतात. डॉक्टरी कार्य बजावतानाच एक क्षण असा येतो की त्यांच्या दोन्ही किडनी निकामी होतात. त्यांच्यासमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा राहतो. अशावेळी त्यांच्या मातोश्री त्यांना स्वतःची किडनी दान करतात आणि तात्यांचा पुनर्जन्म होतो. पुढे ते डॉक्टरी पेशाकडे केवळ पोटाची खळगी भरण्याचा दृष्टिकोन न ठेवता, सामाजिक कार्यात स्वतःला बांधून घेतात. एक लाखाहून अधिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करून, गोरगरिबांना दृष्टी प्रदान करण्याचे बहुमोल कार्य ते बजावतात.
डॉ. तात्याराव लहाने यांचा हा जीवनपट तसा सर्वश्रुत आहे. पण त्याला चित्रपटासारख्या सक्षम माध्यमातून समोर आणल्याने त्याचा प्रसार मोठया प्रमाणावर होईल यात शंका नाही. असा हा पण करणारे दिग्दर्शक विराग वानखेडे त्यासाठी कौतुकास पात्र आहेत. कितीही संकटे आली, तरी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची रुजवात या चित्रपटाने केली आहे. विराग यांच्यासह जवाहर खंदारे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लिहिले आहेत आणि ते चपखल आहेत. केवळ डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनाचा पाढा न वाचता त्यांच्यासमोर वेळोवेळी ठाकलेली आव्हानेही यात ठोसपणे मांडली आहेत. पण तरीही हे चरित्र, एक चित्रपट म्हणून ठसवताना त्यातल्या महत्त्वाच्या घटना ठोसपणे अधोरेखित होणे गरजेचे होते आणि तसे करण्याची संधीही बरीच होती. चित्रपटाची लांबी सुद्धा बरीच वाढली आहे. पूर्वार्धात रेखाटलेला बालपणाचा ट्रॅक कमी केला गेला असता, तर ही कथा आटोपशीर झाली असती. या ट्रॅकपेक्षा डॉक्टरांच्या समाजकार्याच्या संबंधी प्रसंग यात अधिक यायला हवे होते. पण असे असले, तरी दिग्दर्शकाने चित्रपटाचे व्यावसायिक मूल्य ओळखून त्यात रंजकता आणण्याचाही प्रयत्न केला आहे. विशेषतः चित्रिकरणासाठी निवडलेली उत्तम लोकेशन्स आणि त्यावर माधवराज दातार यांच्या फिरलेल्या कॅमेऱ्याने हा चित्रपट बहुरंगी झाला आहे.
डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख भूमिका साकारत मकरंद अनासपुरे यांनी स्वतःवरचा विनोदी अभिनेत्याचा शिक्का पुसण्याचे काम यातून केले आहे. प्रत्यक्षातल्या डॉ. तात्याराव लहाने यांच्या बोलीभाषेचा लहेजा पकडत मकरंद अनासपुरे यांनी त्या भूमिकेशी घट्ट नाते जुळवण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. त्यांच्या मातोश्रींच्या भूमिकेत अलका कुबल यांनी उत्तम कामगिरी केली आहे. फक्त दारिद्र्याच्या खस्ता खाणारी आई दाखवताना, त्यांच्या रंगभूषेवर दिग्दर्शकाने अधिक विचार करणे गरजेचे होते. निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव यांची चांगली साथ चित्रपटाला मिळाली आहे. डॉ. तात्याराव लहाने यांचे कार्य समाजासमोर आणत व माया, ममता, प्रयत्न, जिद्द, महत्वाकांक्षा आदी गुणांचे प्रकटीकरण करत सकारात्मक दृष्टी देणारा हा चित्रपट असल्याने, हा प्रयत्न अधिक महत्त्वाचा ठरतो.