Akeli Movie Review: 'ज्योती'च्या सुटकेची सुन्न करणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 05:16 PM2023-08-23T17:16:23+5:302023-08-23T17:34:52+5:30

अभिनेत्री नुसरत भरुचाचं नवं रूप या सिनेमातून तिच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.

Akelli Movie Review Nushrrat Bharuccha film | Akeli Movie Review: 'ज्योती'च्या सुटकेची सुन्न करणारी कहाणी

Akeli Movie Review: 'ज्योती'च्या सुटकेची सुन्न करणारी कहाणी

Release Date: August 25,2023Language: हिंदी
Cast: नुसरत भरूचा, निशांत दहिया, साही हलेवी, पिल्लू विद्यार्थी
Producer: अपर्णा पाडगावकर, नितीन वैद्य, निनाद वैद्यDirector: प्रणय मेश्राम
Duration: 2 तास ७ मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स

सीरियामधला दहशतवाद, ISIS चं क्रौर्य, इराक-सीरिया युद्ध, कधीही होणारे मिसाईल हल्ले, बॉम्बस्फोट, अत्याचार यावर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली आहे. मन सुन्न करणारे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. काही चित्रपटांमधूनही हे भयाण वास्तव पाहिलं आहे. इराक-सीरियामध्ये घनघोर संघर्ष सुरू असताना, इराकमध्ये नोकरीसाठी गेलेल्या सामान्य भारतीय मुलीची गोष्ट म्हणजे 'अकेली' हा नवा सिनेमा. येत्या २५ ऑगस्टला  हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री नुसरत भरुचाचं नवं रूप या सिनेमातून तिच्या चाहत्यांना पाहता येणार आहे. 

'अकेली'मधील ज्योती ही अमृतसरमध्ये राहणारी अतिशय साधी मुलगी आहे. ती तिच्या आई आणि पुतण्यासोबत राहते. ज्योती कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करत असते. कामाच्या शोधात तिला इराकमधील मोसुल शहरात जावे लागते. इराकमध्ये ज्योतीचं स्वागतच बॉम्बस्फोटानं होते. इराकमध्ये कपड्यांच्या फॅक्टरीत ज्योती काम करत असते. त्यादरम्यान इराकमध्ये ISIS आणि इराकी सैन्यादरम्यान युद्ध सुरू असते. ज्योती या युद्धात फसते आणि जीव वाचवण्यासाठी संघर्ष करू लागते. चित्रपटात 2014 मध्ये इराकमधील मोसुल शहरात इसिसने केलेल्या हल्ल्याची घटना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. युद्धाच्या ठिकाणी अडकलेल्या ज्योतीला इसिसच्या कमांडर पकडतो. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला जातो. पण ती हिंमत हरत नाही आणि परिस्थितीला मोठ्या हिंमतीने तोंड देत आणि मायदेशात परतण्यासाठी लढाई लढते. आता ती ही लढाई जिंकते का?, मायदेशात परत येते का?, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच मिळतील.  

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणय मेश्राम यांनी कथेत अॅक्शन, थ्रिलर आणि सस्पेन्स शेवटपर्यंत टिकवून ठेवला आहे. प्रणय मेश्राम यांनी 'अकेली'च्या निमित्ताने एक धाडसी प्रयोग केला आहे. प्रणय आणि गुंजन सक्सेनाने मिळून या सिनेमाची पटकथा लिहिली आहे.  नुसरत भरुचा आणि चित्रपटाचा दिग्दर्शक प्रणय मेश्राम दोघेही कौतुकास पात्र आहेत. पुष्कर सिंगने उझबेकिस्तानच्या लोकेशनवर चित्रीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. 

नुसरतने ज्योतीची भूमिका रुपेरी पडद्यावर मोठ्या खुबीने जिवंत केली आहे. तिने आपला दमदार परफॉर्मन्स या सिनेमात दिला आहे. 'प्यार का पंचनामा'  'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'ड्रीम गर्ल' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेली नुसरत 'अकेली'सारखा चित्रपट कितपत पेलू शकेल, याबद्दल थोडी शंकाच होती. आपण अशा सिनेमात काम करू असं कधी वाटलं नव्हतं, असं स्वतः नुसरतनेही म्हटलंय. पण 'अकेली' चित्रपटात तिने उभी केलेली ज्योती प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना तिनं स्वत:च्या मेहनतीने आपलं स्थान निर्माण केलं आहे.

नुसरतसोबत निशांत दहियानेही त्याच्या पात्राला चांगला न्याय दिला आहे नुसरतसोबत या सिनेमात काही  इस्त्रायली कलाकारांनीही काम केलं आहे. ठरावीक अंतराने स्टोरीत एका नवा ट्विस्ट येतो आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिनेमा प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास पूर्णपणे यशस्वी ठरतो.

Web Title: Akelli Movie Review Nushrrat Bharuccha film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.