Main ladega: आईला वाचवण्यासाठी आकाश जिंकेल का बॉक्सिंगच्या रिंगणातील डाव?

By संजय घावरे | Published: April 27, 2024 04:29 PM2024-04-27T16:29:40+5:302024-04-27T16:32:01+5:30

Main ladega review: वडिलांच्या तावडीतून आईला सोडवण्यासाठी बॅाक्सिंग रिंगमध्ये उतरलेल्या अभ्यासात हुशार असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याची कथा यात आहे.

reviews-main-ladega-review-staring-akash-pratap-singh-ashwath-bhatt-jyoti-gauba-gandharv-deewan | Main ladega: आईला वाचवण्यासाठी आकाश जिंकेल का बॉक्सिंगच्या रिंगणातील डाव?

Main ladega: आईला वाचवण्यासाठी आकाश जिंकेल का बॉक्सिंगच्या रिंगणातील डाव?

Release Date: April 26,2024Language: हिंदी
Cast: आकाश प्रताप सिंग, वल्लारी विराज, गंधर्व दिवाण, अश्वथ भट्ट, सौरभ पचौरी, दिव्य खरनारे, राहिल सिद्दीक
Producer: अक्षय भगवानजी, पिनाकिन भक्तDirector: गौरव राणा
Duration: 2 तास 28 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

कानपूरवासी असलेल्या आकाश प्रताप सिंगने मुंबईत आल्यावर काही निर्माते-दिग्दर्शकांचे उंबरठे झिजवले. त्यानंतर स्वत:ला नायकाच्या रूपात सादर करण्यासाठी कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं. काहीशी आकाशच्या जीवनाशी साधर्म्य असलेल्या कथेवर दिग्दर्शक गौरव राणा यांनी हा चित्रपट बनवला आहे. वडिलांच्या तावडीतून आईला सोडवण्यासाठी बॅाक्सिंग रिंगमध्ये उतरलेल्या अभ्यासात हुशार असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याची कथा यात आहे.

कथानक : अवध भागातील आकाशची कथा तिथल्या कोणत्याही मुलाची असू शकते. वडिलांकडून आईला होणाऱ्या मारहाणीची चिंता आकाशला कायम सतावत असते. धाकटा भाऊ वंशला वडिलांपासून वाचण्यासाठी काय करायला हवे हे तो दररोज शाळेत जाताना शिकवतो. वेळप्रसंगी आजोबांना (आईच्या वडिलांना) फोन करण्यासाठी त्याला फोन नंबरही पाठ करायला लावतो. एकदा वडील आईला खूप मारतात. आजोबा तिला रुग्णालयात दाखल करतात. घरातील वातावरणाचा परिणाम बारावीतील आकाशच्या अभ्यासावर होऊ नये यासाठी त्याला सैनिक शाळेत पाठवतात. तिथे आईला वडिलांच्या तावडीतून सोडवण्याची संधी दिसताच आकाश बॅाक्सिंग रिंगमध्ये उतरतो. 

लेखन-दिग्दर्शन : हा केवळ बॅाक्सिंचा खेळ नसून, ही कथा विविध मुद्द्यांना स्पर्श करते. पटकथेत नाट्यमय घडामोडींची सुरेख पेरणी आहे. काही उणीवांकडे दुर्लक्ष करता येऊ शकते. घरगुती हिंसाचार, आईची काळजी, वडील खलनायक बनल्यावर विविध पातळ्यांवर लढावी लागणारी लढाई, निस्वार्थ मैत्री, निरागस प्रेम, जिंकण्याची जिद्द असं बरंच काही यात आहे. 'शो मस्ट गो ऑन' म्हणत लढण्याची मानसिकता आहे. 'तू रोएगा नहीं, भागेगा भी नहीं, तू लडेगा...'सारखे धीर देणारे संवाद आहेत. बॅाक्सिंगचे वास्तवदर्शी डावपेच आहेत. कुठेही मेलो ड्रामा न करता प्रेमकथेची नाजूकशी किनार जोडली आहे. 'तेरी आंचल से वो माँ...' हे गाणं चांगलं आहे. 

अभिनय : आकाश सिंगला लेखन, अभिनय आणि मेहनतीसाठी १०० गुण द्यावे लागतील. संवादफेक करण्यापूर्वी त्याने दिलेल्या रिअॅक्शन्स बरंच काही सांगून जातात आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव थेट मनाला भिडतात. वल्लारी विराजने नायिकेच्या भूमिकेत हळूवार भरलेले रंगही आकर्षित करतात. अश्वथ भट्ट यांनी साकारलेल्या वडिलांची प्रचंड चीड येते. हेच या कॅरेक्टरचं यश आहे. कोच गुरुनामच्या भूमिकेत गंधर्व दिवाणने अत्यंत संयत अभिनय केला आहे. मित्रांच्या टिममधील सौरभ पचौरी, दिव्य खरनारे, अहान निर्वाण यांनी चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, क्लायमॅक्स, बॅाक्सिंग, सिनेमॅटोग्राफी
 

नकारात्मक बाजू : गीत-संगीत, काही न पटणाऱ्या गोष्टी

थोडक्यात काय तर अशा प्रकारचे सिनेमे बनायला हवेत. निर्माते-प्रस्तुतकर्त्यांनी त्यासाठी पुढे यायला हवे आणि रसिकांनीही स्टारडमच्या मोहाजाळात न अडकता नवोदित कलाकारांचे सिनेमेही पाहायला हवेत.

Web Title: reviews-main-ladega-review-staring-akash-pratap-singh-ashwath-bhatt-jyoti-gauba-gandharv-deewan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.