रमन राघव -‘UGLYY’ चित्रण

By Admin | Updated: June 27, 2016 03:02 IST2016-06-27T03:02:21+5:302016-06-27T03:02:21+5:30

‘रमन राघव २.०’ हा दिग्दर्शक अनुराग कश्यपचा सिनेमा.

Raman Raghav -'UGLYY 'illustration | रमन राघव -‘UGLYY’ चित्रण

रमन राघव -‘UGLYY’ चित्रण

- सुवर्णा जैन

‘रमन राघव २.०’ हा दिग्दर्शक अनुराग कश्यपचा सिनेमा. अनुरागची निर्मिती असलेल्या ‘उडता पंजाब’भोवती निर्माण झालेल्या वादानंतर अनुराग दिग्दर्शित हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमा रमन राघव नावाच्या सायको सिरीयल किलर असलेल्या रियल व्यक्तीवर आधारित आहे. १९६०च्या दशकात रमन राघव नावाच्या सिरीयल किलरची मुंबईत दहशत पसरली होती.
सिनेमात सायको सिरीयल किलर रामण्णाची भूमिका नवाजुद्दिन सिद्दिकीनं साकारलीय. नवाजुद्दिननं आपल्या दमदार अभिनयानं या भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. नवाजुद्दिनच्या अभिनयाच्या विविध छटा तुम्हाला नक्कीच भावतील. तो तुम्हाला कधी-कधी भीतीदायकही वाटेल. तर दुसरा सायको सिरीयल किलरचा पाठलाग करणारा विकी कौशलनं साकारलेला राघवन हा पोलीसही तितकाच भाव खाऊन जातो. या सिनेमात अमृता सुभाष आणि मिस इंडिया अर्थ २०१३ची शोभिता धुलिपाला यांनी भूमिका साकारल्या आहेत. शोभिताचा हा पहिलाचा सिनेमा आहे. मात्र या दोघींच्याही भूमिकांमध्ये काही करण्यासारखं नसल्याचं वाटतं. अभिनेत्रींना सिनेमात दिलेलं कमी महत्त्व, वैविध्याचा अभाव हा सिनेमाचा वीक पॉइंट ठरू शकतो.
राम संपत यांनी सिनेमाला संगीत दिलंय. सिनेमात एकही गाणं नसून संगीत फक्त एखाद्या सीनच्या बॅकग्राऊंडला सुरू असतं. या संगीतामध्ये निराशा, राग व्यक्त झाला असला, तरी सिनेमा बघताना ते संगीत कर्णकर्कश आणि डोईजड वाटतं.
अनुराग कश्यपचा हा सिनेमा कसा असेल, अशी उत्सुकता रसिकांना होती. हा सिनेमा म्हणजे टिपिकल अनुराग कश्यप स्टाइल म्हणावा लागेल. हा सिनेमा पाहताना तुम्हाला कधी त्याच्याच ‘अग्ली’ आणि ‘गँग आॅफ वासेपूरची’ही आठवण येईल. सिनेमात अतिरक्तरंजितपणा दाखवल्यासारखं वाटेल. मात्र ती कथेची गरज असल्यानं त्याकडं काहीसं दुर्लक्ष करता येऊ शकतं. हा सिनेमा पाहायचा असेल, तर तो फक्त नवाजुद्दिनच्या अभिनयासाठी पाहावा, असंच म्हणावं लागेल. सायको सिरीयल साकारताना नवाजुद्दिनं त्यात जीव ओतलाय.

Web Title: Raman Raghav -'UGLYY 'illustration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.