राज कपूर इज इंडिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 13:45 IST2024-12-15T13:45:25+5:302024-12-15T13:45:55+5:30

पृथ्वीराज कपूरपासून राज कपूरपर्यंत बरेच जण इंडियन पीपल थिएटर म्हणजे इप्टा या संस्थेशी जोडलेले होते.

raj kapoor is India | राज कपूर इज इंडिया...

राज कपूर इज इंडिया...

जब्बार पटेल, दिग्दर्शक

राज कपूर यांच्याशी माझी प्रत्यक्ष ओळख होती. संपूर्ण भारताच्या परिप्रेक्ष्यातील थोर चित्रपट दिग्दर्शक. विशिष्ट विचारांनी भारावून चित्रपट बनवणारी माणसे खूप कमी असतात. त्यापैकी राज कपूर होते. याचे प्रतिबिंब त्यांच्या सर्वच चित्रपटांमध्ये दिसते. समाजिक बांधिलकीची जाण राखून आशय सशक्तपणे मांडताना करमणूकप्रधान सिनेमा बनवण्याची हातोटी असलेला फिल्ममेकर म्हणजे राज कपूर... त्यांचे ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटही आजच्या काळातील संदेश देणारे आहेत. त्या काळातील ही मंडळी डाव्या विचारसरणीशी जुळलेली होती. पृथ्वीराज कपूरपासून राज कपूरपर्यंत बरेच जण इंडियन पीपल थिएटर म्हणजे इप्टा या संस्थेशी जोडलेले होते.

पृथ्वीराजसारख्या दिग्गज कलावंताचा मुलगा म्हणून राज यांनी सुरुवात केली, पण वडिलांनी त्यांना सुरुवातीला बेसिक काय करणार, हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राज यांनी सुरुवातीला केदार शर्मा यांच्याकडे चौथा असिस्टंट म्हणून काम केले. त्यांच्या सानिध्यात राहून चित्रपटाचे तंत्र आत्मसात केल्यावर 'आग' चित्रपट बनवला. पण, काही कारणाने चित्रपट चालला नाही. त्यानंतर त्यांनी वेगळा विचार करून के. अब्बास आणि वसंत साठे यांच्या साथीने 'आवारा' बनवला. 'आवारा'मुळे संपूर्ण जगासोबत ते कनेक्ट झाले. चार्ली चॅप्लीनचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे डावी विचारसरणी, चॅप्लीन, रस्त्यावरचा साधा माणूस, झोपडपट्टी, गरिबी, अवहेलना यांची सांगड त्यांनी 'आवारा' मध्ये घातली. या चित्रपटामुळे परदेशांमध्ये राज यांचे नाव झाले.

'श्री ४२०'मध्ये त्यांनी घराचा विषय मांडला. आजही भारतात ती समस्या आहे. के. अब्बास आणि राज यांचा दूरदर्शीपणा यातून दिसतो. 'जिस देश में गंगा बहती है'मध्ये समाजाशी निगडित विषय आहे. 'मेरा नाम जोकर' सारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट बनवला. दुर्दैवाने तो न चालल्याने त्यांना मोठा धक्का बसला; पण ते खचले नाहीत. त्यानंतर त्यांनी तरुणांसाठी 'बॉबी' बनवला. यात निखळ प्रेमभावना आहे. या चित्रपटाने त्यांना अपार यश दिले. त्यांनी 'अंदाज' चित्रपटामध्ये दिलीपकुमार यांच्यासोबत काम केले होते. त्याचा आणखी एक टेक ऑफ करावा असे वाटल्याने त्यांनी 'संगम' बनवला. हा चित्रपटही खूप गाजला. 'प्रेमरोग' हा संगीतप्रधान चित्रपट त्यांना मोठे यश देऊन गेला. ते कायम समाजाचे सूक्ष्म निरीक्षण करायचे. आपला देश कुठेतरी दुसऱ्या दिशेला चाललाय हे त्यांच्या लक्षात आले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तसे स्वातंत्र्य आहे का, असा प्रश्न करणारा 'राम तेरी गंगा मैली' बनवला. 'जिस देश में गंगा बहती है' म्हणणारा माणूस नंतर 'राम तेरी गंगा मैली' असे म्हणतो, हा फार मोठा विरोधाभास आहे.

मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये जेव्हा 'उंबरठा' चित्रपटाचा शो होता, तेव्हा राज यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी स्मिता पाटीलसह मी तिसऱ्या रांगेत बसलो होतो. त्यावेळी भारताबाहेर 'राज कपूर इज इंडिया' असे म्हटले जायचे. तो धागा पकडून राज यांचे मानपत्र वाचणारी व्यक्ती 'राज कपूर इज इंडिया' असे म्हणाली, तेव्हा राज यांनी त्यांना थांबवले. ते म्हणाले की, 'राज कपूर इज इंडिया' असे म्हणता येणार नाही. कारण इथे काही मंडळी अशी आहेत, जे माझ्यासारखे सिनेमे करत नाहीत. ते वेगळे चित्रपट बनवत असले तरी त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान फार मोठे आहे. त्यांनी आम्हाला उभे राहायला सांगून ओळख करून दिली. राज यांचे व्यक्तिमत्त्व आनंददायी, समोरच्याला आदराने वागवणारे, उदारमतवादी, प्रेरणादायी होते. त्यांच्या डोक्यात २४ तास सिनेमाच असायचा. नव्या वाटा शोधणारा भारतीय फिल्ममेकर अशी राज यांची जगभर ख्याती आहे.

मुंबईत राज यांचा आरके स्टुडिओ होता; पण लोणी-काळभोरजवळ त्यांनी १०० एकर जागेत राजबाग स्टुडिओ उभारला. इथेच त्यांनी 'सत्यम शिवम सुंदरम' सह १३-१४ चित्रपटांचे चित्रीकरण केले. आपल्या पश्चात या जागेचा व्यावसायिक वापर न करता शिक्षणासाठी करावा, असे त्यांनी मृत्युपत्रात लिहून ठेवले. त्यामुळे ती जागा विश्वनाथ कराड यांच्या एमआयटी संस्थेकडे आली. इथे फिल्म इन्स्टिट्यूट आणि ड्रामा स्कूलसह १३ कॉलेजेस आहेत. इथेच राज यांनी वडील पृथ्वीराज आणि आई रामसरणीदेवी यांची समाधी बांधली आहे.

 

Web Title: raj kapoor is India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.