"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 12:16 IST2025-08-18T12:13:10+5:302025-08-18T12:16:14+5:30
वयाचं भान राखून आता सिनेमे निवडायला हवे असं आर माधवन नुकतंच एका मुलाखतीत म्हणाला.

"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
अभिनेता आर माधवन (R Madhavan) चाहत्यांमध्ये 'मॅडी' नावाने ओळखला जातो. २००१ साली आलेल्या 'रहना है तेरे दिल मे' सिनेमातून तो स्टार झाला. आज तो ५५ वर्षांचा आहे. तरी आजही तरुणींसाठी तो 'मॅडी'च आहे. माधवनचा काही दिवसांपूर्वीच 'आप जैसा कोई' सिनेमा रिलीज झाला. यात त्याची आणि फातिमा सनी शेखची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. सिनेमाची कथाही खूप इंटरेस्टिंग होती. फातिमा माधवनपेक्षा बरीच लहान आहे. पुरुषांना वयामुळे असलेल्या इनसिक्युरिटीवर सिनेमात भाष्य केलं आहे. वयाचं भान राखून आता कॅरेक्टर निवडायला हवे असं आर माधवन नुकतंच एका मुलाखतीत म्हणाला.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आर माधवन म्हणाला, "जेव्हा तुमच्या मुलांचे मित्र तुम्हाला 'काका'अशी हाक मारतात तेव्हा पहिल्यांदाच वय झाल्याचं वास्तव आपल्याला धक्का देतं. थोडा धक्का बसतो पण हे पचवावंच लागतं. वाढत्या वयानुसार सिनेमांची निवड करतानाही ते लक्षात घेणं गरजेचं असतं. सिनेमा करताना हिरोईन कोण आहे हेही बघावं लागतं. त्या अभिनेत्रीला भलेही आपल्यासोबत काम करायची इच्छा असली तरी आपलं वय काय आणि तिचं वय काय हे पाहणं गरजेचं असतं. नाहीतर लोक म्हणतात सिनेमाच्या नावाखाली अभिनेता मजा घेत आहे. लोकांना जर असं वाटलं तर सिनेमातील त्या भूमिकेबद्दल आदर राहत नाही."
तो पुढे म्हणाला, "माझ्या शरिरात आता ती ताकद राहिली नाही जी वयाच्या २२ व्या वर्षी असते. त्यामुळे वाढतं वय पाहता आपण कोणासोबत काम करतोय याकडेही लक्ष द्यावं लागतं. जेणेकरुन लोकांना हे विचित्र वाटायला नको."
आर माधवन आगामी 'धुरंधर' सिनेमात दिसणार आहे. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट आहे. ५ डिसेंबर रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.