"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:59 IST2025-07-02T11:58:49+5:302025-07-02T11:59:44+5:30
'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा शेवटचा भाग नुकताच शूट करण्यात आला आहे. मालिकेतील सावनी पात्र साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकरने पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
'प्रेमाची गोष्ट' ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेतील मुक्ता-सागरची जोडी आणि सावनीने साकारलेली खलनायिका प्रेक्षकांना आवडली. मालिकेला प्रेक्षकांकडूनही भरपूर प्रेम मिळालं. पण, ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा शेवटचा भाग नुकताच शूट करण्यात आला आहे. मालिकेतील सावनी पात्र साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकरने पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
अपूर्वा नेमळेकरची पोस्ट
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या सेटवर काल माझा शेवटचा दिवस होता. दोन वर्षांचा हा प्रवास अडथळे, शिकवणी आणि सुंदर आठवणींचा होता. शेवंतापासून ते सावणीपर्यंत...एक अभिनेत्री आणि व्यक्ती म्हणूनही माझ्यासाठी हा बदल खूप महत्त्वाचा आहे.
या मालिकेचा प्रवास कधीच सोपा नव्हता. आम्ही खूप कठीण काळ बघितला. काही पात्र बदलली, अनेकांनी मध्येच मालिका सोडली, या सगळ्यांनी आमची परिक्षा घेतली. पण, काहीही झालं तरी मालिकेची उत्सुकता, एनर्जी आणि मजा मस्ती कमी होणार नाही, याची आम्ही काळजी घेतली. या प्रवासाने मला शिकवलं की कमिटमेंट म्हणजेच सगळं काही. एक कलाकार म्हणून कठीण काळातही तुमची कला, तुमची टीम आणि तुमच्या प्रेक्षकांसोबत खंबीरपणे उभं राहणं हेच महत्त्वाचं आहे. आणि यासाठीच मला स्वत:चा अभिमान आहे.
मी सावनी हे पात्र करण्याचं ठरवलं कारण मला निगेटिव्ह रोलमध्ये काम करण्याचा अनुभव घ्यायचा होता. त्यासोबतच यात मी आणखी काय नवं देऊ शकते हे पाहायचं होतं. लूकपासून ज्वेलरी, डायलॉग ते बॉडी लँगवेज...प्रत्येक छोटी गोष्ट महत्त्वाची ठरते. टीमने जसा विचार केला होता तशी सावनी मी पडद्यावर दाखवण्याचा मी प्रयत्न केला. त्यांनी मला सावनीच्या भूमिकेसाठी योग्य समजलं याबद्दल आभार.
आम्हाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला पण निगेटिव्ह भूमिकेची हीच गंमत असते. जर सावनीला ट्रोल केलं जातंय म्हणजे माझं काम लोकांपर्यंत पोहोचतंय. बेस्ट निगेटिव्ह रोल आणि द मोस्ट ग्लॅमरस फेस ऑफ द इयर २०२४ हे अवॉर्ड माझ्यासाठी स्पेशल आहेत. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाचा अवॉर्ड तुमची मनं जिंकणं आणि तुम्हाला सावनी म्हणून त्रास देणं हा आहे.
माझी टीम, स्टार प्रवाह, सहकलाकार, लेखक आणि त्या प्रत्येक माणसाचे मी आभार मानू इच्छिते ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्यासोबत उभे राहिले आणि सावनी साकारण्यासाठी मदत केली. या भूमिकेला बाय म्हणणं सोपं नाही. पण, काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीचा शेवट करावा लागतो. मी पुन्हा नवी भूमिका, नवी कथा घेऊन तुमच्या भेटीला येईन.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सुरुवातीला तेजश्री प्रधान मुक्ताची भूमिका साकारत होती. मात्र मालिका चांगली सुरू असतानाच अचानक तेजश्रीने एक्झिट घेतली. त्यानंतर स्वरदा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेत दिसली.