प्रशांत दामलेंचं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मोठं योगदान, अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिली 'इतकी' रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:54 IST2025-11-19T13:54:05+5:302025-11-19T13:54:32+5:30
प्रशांत दामले यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त बांधवांसाठी मदतीचा मोठा हात पुढे केला आहे.

प्रशांत दामलेंचं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मोठं योगदान, अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिली 'इतकी' रक्कम
लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकताच त्यांच्या कारकिर्दीतील एक नवा आणि अभूतपूर्व विक्रम नोंदवला. रंगभूमीवर सलग अनेक वर्षे आपली जादू कायम ठेवत दामले यांनी आता त्यांच्या नाटकाचा १३,३३३ वा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. १६ नोव्हेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात त्यांच्या नाटकाचा १३,३३३ वा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला. हा एकट्या मराठीच नव्हे, तर भारतीय रंगभूमीसाठीही मोठा रेकॉर्ड आहे. या ऐतिहासिक क्षणाचं औचित्य साधत, प्रशांत दामले यांनी एक सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय घेतला. ज्यामुळे त्यांच्या या यशाची उंची आणखी वाढली आहे.
प्रशांत दामले यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी थेट 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' मध्ये १३ लाख ३३ हजार ३३३ रुपये इतके भरीव योगदान दिले. दामले यांनी स्वतः ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये प्रशांत दामले यांनी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले. ते म्हणाले, "१३,३३३वा प्रयोग, रसिकांचं प्रेम आणि बरंच काही... माझ्या कारकीर्दीतील १३, ३३३वा प्रयोग १६ नोव्हेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. आजवर माझ्या प्रत्येक प्रयोगाला जसा रसिकप्रेक्षकांचा प्रतिसाद असतो, तसाच उदंड प्रतिसाद आणि प्रेम मला यावेळीही अनुभवता आलं".
पुढे त्यांनी लिहलं, "या विशेष कार्यक्रमावेळी एक 'खारीचा वाटा' म्हणून, माझ्याकडून आणि समस्त नाट्यरसिकांच्या वतीने महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना १३ लाख ३३३ रुपयांची मदतही मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिली. त्याचबरोबर राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे या विशेष सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार! आणि रसिकप्रेक्षकांनो... तुमचं प्रेम असंच वाढत राहो!". प्रशांत दामले यांच्या या मोठ्या देणगीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची प्रशंसा केली आणि शेतकऱ्यांना मदत केल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.