"रिलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 11:35 IST2025-08-25T11:34:48+5:302025-08-25T11:35:36+5:30

प्रसाद ओकच्या वक्तव्यानंतर धनंजय पोवारने मांडली समस्त रिलस्टार्सची मेहनत

prasad oak comments on reel stars says they are not actors dhananjay powar gives reply | "रिलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...

"रिलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...

आजकाल सोशल मीडियावरील रील्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सची संख्या यावर मनोरंजनविश्वात काम मिळणार की नाही हे अवलंबून असतं. अनेकदा फॉलोअर्सची संख्या कमी असेल तर त्या कलाकाराला प्रोजेक्टमध्ये घेतलं जात नाही. नुकतंच या विषयाला धरुन महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये एक स्किट सादर करण्यात आलं. त्यावर अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) त्याचं म्हणणं मांडलं. रील करणं म्हणजे तुम्ही अभिनेते किंवा अभिनेत्री होत नाही असं तो स्पष्ट म्हणाला. त्याचा व्हिडिओ एका अभिनेत्याने शेअर केला. त्या व्हिडिओवर रिल स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या धनंजय पोवारने (Dhananjay Powar) कमेंट करत उत्तर दिलं आहे.

काय म्हणाला प्रसाद ओक?

हास्यजत्रेतील स्किट पाहून प्रसाद ओक म्हणाला, ""हा अत्यंत महत्वाचा विषय होता की रील्स करुन आपण अभिनेते किंवा अभिनेत्री आहोत असं ज्यांना ज्यांना वाटायला लागलंय हा प्रचंड मोठा गैरसमज समाजात पसरत चाललेला आहे. ज्यांच्या रील्सला काही हजार, मिलियन, बिलियन व्ह्यूज आहेत, फॉलोअर्स आहेत त्यांचं नाटक बघायला १० माणसंही येत नाहीत हे तथ्य आहे. त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की आपण रील करुन स्टार होऊ शकतो तर हा खूप मोठा भ्रम आहे. रील्स म्हणजे अभिनय अजिबात नाही. हा इतक्या महत्वाचा विषय अगदी हलक्या शब्दात तुम्ही मांडलात. ज्यांना कळायचं होतं शिकायचं होतं ते शिकतील नाही तर त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. आपण आपलं काम केलं."


धनंजय पोवारची कमेंट

प्रसाद ओक यांच्या या व्हायरल व्हिडिओवर बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक रिल स्टार धनंजय पोवारने कमेंट करत लिहिले, "जे प्रसाद ओक बोलले हे थोडे फार प्रमाणात मी मान्य करू शकतो. त्याचे कारण पण मी इथे सांगतो की नाटकासाठी खरंच खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती सहजा सहजी जमत नाही. पण आमचे क्रिएटर म्हणजे आकाश भापकर आणि अथर्व सुदामे यांनी हाउसफुल शो करून दाखवले आहेत. मान्य आहे की आम्ही एक मिनिटांचा रील करतो पण आम्ही स्वतः स्क्रिप्ट लिहितो स्वतः एडिट करतो. ही मेहनत तुम्ही नाही करत ना पण आम्ही करतो. आम्हालाही कला आहे आम्ही ही कला करतो आम्हालासुद्धा थोडीशी का होईना रिस्पेक्ट आहे ती तुम्ही द्यावी कारण आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतो. मला या गोष्टीचा राग नाही की तुमच्या नजरेत आम्ही शून्य आहोत पण आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही पण लोकांना हसवून त्यांना छोटासा का होईना आनंद देतो. मी स्वतः बिगबॉस मध्ये असताना एकही क्रिएटरला कमी लेखलो नाही कारण त्या लोकांसाठी आम्हाला एक प्लॅटफॉर्म उभा करता येईल या उद्देशाने जगलो. प्रसाद ओक सर तुम्ही एकदा माझा मेसेज बॉक्स उघडा मी तुमचा केवढा मोठा चाहता आहे हे कळेल."

Web Title: prasad oak comments on reel stars says they are not actors dhananjay powar gives reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.