प्रभासने केली 'द स्क्रिप्ट क्राफ्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल'ची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:29 IST2025-12-24T18:29:28+5:302025-12-24T18:29:47+5:30
Prabhas : बाहुबली, सालार आणि कल्कि 2898 ए.डी. सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून आपली पॅन-इंडिया ओळख निर्माण करणाऱ्या सुपरस्टार प्रभासने आपल्या द स्क्रिप्ट क्राफ्ट या संकेतस्थळावरून ‘द स्क्रिप्ट क्राफ्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’ची घोषणा केली.

प्रभासने केली 'द स्क्रिप्ट क्राफ्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल'ची घोषणा
बाहुबली, सालार आणि कल्कि 2898 ए.डी. सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून आपली पॅन-इंडिया ओळख निर्माण करणाऱ्या सुपरस्टार प्रभासने आपल्या द स्क्रिप्ट क्राफ्ट या संकेतस्थळावरून ‘द स्क्रिप्ट क्राफ्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’ची घोषणा केली. या लघुपट महोत्सवाद्वारे जागतिक कथाकथनाला नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असून आपल्या द स्क्रिप्ट क्राफ्ट या संकेतस्थळावरून एका दमदार व्हिडीओद्वारे प्रभासने ही घोषणा केली. पारंपरिक स्पर्धांपेक्षा वेगळा असा हा फेस्टिव्हल जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या स्टोरीटेलर्सना सशक्त बनवेल. जगभरातील क्रिएटर्सना थेट ओळख मिळवून देऊन, निर्माते आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत त्यांच्या स्वप्नांना सिनेमॅटिक करिअरमध्ये रूपांतरित करण्याची ही संधी असल्याचे प्रभास यावेळी म्हणाला. हा क्रांतिकारी उपक्रम जागतिक स्टोरीटेलिंगमध्ये नव्या युगाची सुरुवात करेल, असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लघुपट निर्मात्यांना आपली दोन मिनिटे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या, कोणत्याही जॉनरमधील शॉर्ट फिल्म्स द स्क्रिप्ट क्राफ्ट या संकेतस्थळावर उपलोड करायच्या आहेत. यासाठी ९० दिवसांचा कालावधीत असून या कालावधीत लघुपटकर्त्यांना आपले लघुपट अपलोड करून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या माध्यमातून द स्क्रिप्ट क्राफ्टवर आधीच नव्या प्रतिभेच्या शोधात असलेल्या प्रमुख प्रोडक्शन हाऊसेससमोर स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल. प्रेक्षकांचे वोट्स, लाइक्स आणि रेटिंग्स यांच्या आधारे तीन सर्वोत्तम लघुपटांची निवड होणार असून लघुपटांना अनुक्रमे ३ लाख, २ लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक असणार आहे. क्विक टीव्हीची अंतर्गत ज्यूरी टीम १५ उत्कृष्ट फिल्मकारांची निवड करणार आहे. ज्युरींनी निवडलेल्या फिल्मकरांच्या या लघुपटांवर क्विक टीव्ही ९० मिनिटांच्या फिल्मसाठी निर्मिती खर्चासोबत संपूर्ण प्रोडक्शन सपोर्ट करणार आहे. यातून तयार झालेल्या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर क्विक टीव्हीवर करण्यात येणार आहे. यामुळे १५ क्रिएटर्सना शॉर्ट फिल्म्समधून थेट व्यावसायिक दिग्दर्शन करिअरमध्ये पाऊल ठेवण्याची आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळवण्याची संधी यातून मिळणार आहे.
TheScriptCraft.com वर नोंदणी सुरू असून सबमिशनच्या अचूक तारखा आणि श्रेणी लवकरच जाहीर केल्या जातील. प्रभासच्या दूरदर्शी विचारांपासून प्रेरित द स्क्रिप्ट क्राफ्टची स्थापना थल्ला वैष्णव आणि प्रमोद उप्पलपति यांनी केली आहे. लेखक, स्टोरीटेलर्स आणि दिग्दर्शकांना आपली सर्जनशीलता सादर करण्यासाठी आणि नव्या प्रतिभेला घडवण्यासाठी हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.