"मुलांचं यश म्हणजे त्यांची मेहनत अन् मुलींचं..." सोनाली कुलकर्णीने स्त्री-पुरुष विषमतेवर ठेवलं बोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 18:51 IST2024-02-15T18:37:09+5:302024-02-15T18:51:30+5:30
मराठी, हिंदीनंतर सोनालीने नुकतंच मल्याळम सिनेमातही पदार्पण केलं आहे. तिने थेट सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत काम केलं.

मराठीतली अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) तिच्या सौंदर्याने, नृत्याने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत असते. घाऱ्या डोळ्यांची ही अप्सरा अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीत राज्य करत आहे.

'नटरंग'मधील 'अप्सरा आली' ही तिची लावणी विशेष गाजली.'बकुळा नामदेव घोटाळे' हा तिचा पहिला सिनेमा. नंतर 'मितवा','गाढवाचं लग्न','पांडू','पोस्टर गर्ल', 'अजिंठा', 'क्लासमेट्स', 'हिरकणी' अशा अनेक सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली.

आता सोनाली थेट साऊथमध्येही अभिनयाचा डंका गाजवत आहे. मल्याळम सुपरस्टार मोहनलालसोबत ती 'मलईकोट्टई वालीबन' या सिनेमात झळकली. या सिनेमातही तिच्या नृत्याची खास झलक दिसली. शिवाय तिने स्वत: मल्याळममध्ये डायलॉग्स म्हटले आहेत.

सध्या सर्वत्र सोनालीचं कौतुक होत आहे. नुकतंच तिने ईटाईम्सला मुलाखत दिली. यावेळी तिला एक मुलही म्हणून या इंडस्ट्रीत कशाप्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सोनालीने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.

सोनाली म्हणाली, " जर पुरुष कलाकारने गाडी घेतली, घर घेतलं तर त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं असं म्हटलं जातं. पण हेच जर मुलीने घेतलं तर नक्कीच कोणा नेत्याने, निर्मात्याने गिफ्ट दिलं असेल असं बोललं जातं. ही फारच हीन वागणूक आहे."

ती पुढे म्हणाली, "हे तेच लोक असतात जे म्हणतात की ही तर ३६५ दिवस कामात व्यस्त असते. मग तुम्हीच सांगा एखाद्या महिलेबद्दल लोकांचा असा विचार का? मला ही मानसिकता अजिबात आवडत नाही. ज्याप्रकारे पुरुषाने त्याच्या कष्टाने यश मिळवलं असतं तसंच महिलेनेही तितकीत मेहनत घेतलेली असते. तिला तिचं श्रेय मिळालं पाहिजे."

कॉम्प्रमाईज करण्याबाबत सोनाली म्हणाली, "मला अभिमान वाटतो की माझ्या करिअरमध्ये आजपर्यंत कधीच कॉम्प्रमाईज केलेले नाही. मानसिक, शारिरीक अशा कोणत्याही पद्धतीची तडजोड मी केली नाही. मी माझ्या अटींवर काम केलं आणि यश मिळवलं. "

सोनालीने 'ग्रँड मस्ती 2','सिंघम रिटर्न्स' या हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे. तिला पुन्हा एखाद्या हिंदी सिनेमात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

















