Shark Tank India: माहितीये कुठे आहे मराठमोळा जुगाडू कमलेश? आता शेतकऱ्यांसाठी तयार केलं नवं मशीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 18:44 IST2023-02-02T18:24:42+5:302023-02-02T18:44:10+5:30

शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये आलेल्या जुगाडू कमलेशनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्याच्या कंपनीत लेन्सकार्टच्या पीयूष बन्सल यांनी गुंतवणूक केली होती.

'शार्क टँक इंडिया'चा पहिला सीझन चांगलाच यशस्वी ठरला होता. पहिल्या पर्वात अनेक उद्योजकांनी आपल्या कल्पनांनी लोकांची मने जिंकली. या काही लोकप्रिय उद्योजकांमध्ये जुगाडू कमलेशच्या नावाचाही समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या जुगाडू कमलेशने आपल्या कल्पनेने शार्क्स आणि चाहत्यांना प्रभावित केले होते. 'शार्क टँक इंडिया'नंतर घरोघरी लोकप्रिय झालेला जुगाडू कमलेश आता काय करतोय ते जाणून घेऊया.

'शार्क टँक इंडिया’मुळे प्रसिद्ध झालेला कमलेश घुमरे म्हणजेच जुगाडू कमलेश हा महाराष्ट्रातील मालेगावमधील रहिवासी आहे. गावात राहत असताना कमलेश घुमरे यांच्या लक्षात आले की, पावसाळ्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालवणे कठीण जाते. शेतकऱ्यांच्या अडचणी पाहून कमलेशने जुगाड शोधून केबिनसह ट्रॅक्टर बनवला.

यानंतर शेतात बियाणे पेरताना अडचण येत असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने त्यासाठीही मशीन तयार केले. कमलेशचा कोणताही बिझनेस प्लॅन नव्हता. पण जुगाडच्या बाबतीत त्याचं मन एखाद्या सुपरफास्ट ट्रेनसारखं धावायचं. याचा फायदा घेत त्याने 'शार्क टँक इंडिया'चा टप्पा गाठला.

'शार्क टँक इंडिया'च्या मंचावर येताना जुगाडू कमलेशने आपली कल्पना शार्क्ससमोर म्हणजेच जजेसमोर ठेवली. शार्क्सशी बोलताना कमलेशने सांगितले की, त्याला मार्ग दाखवणाऱ्यांची गरज आहे. सर्व शार्कमध्ये, पीयूष बन्सल यांना कमलेशची कल्पना आवडली आणि त्यांनी त्याला पुढे जाण्याची संधी दिली.

पीयूष बन्सल यांनी जुगाडू कमलेशला 10 लाखांच्या बदल्यात 40 टक्के इक्विटी आणि 20 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले. जुगाडू कमलेशनं लेन्सकार्टच्या पीयूष बन्सल यांची ऑफरही स्वीकारली.

आता जुगाडू कमलेश काय करतोय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पीयूष बन्सल यांच्या मदतीने, जुगाडू कमलेश आजकाल त्याचा मित्र नारूसोबत त्याच्या व्यवसायाच्या कल्पनांवर लक्ष केंद्रित करत आहे. याशिवाय त्यांनी शेतकऱ्यांसाठी 'भारत के 2' हा नवा शोधही लावला आहे. जुगाडू कमलेशनं शेतात कीटकनाशक फवारणीसाठी मशीनचं तिसरं व्हर्जनही तयार केलं आहे. हे मशीन सर्व प्रकारच्या शेतीत काम करण्यास सक्षम आहे.

जुगाडू कमलेशने एक यूट्यूब व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पीयूष बन्सल यांना आपल्या प्रोडक्टबद्दल सांगत आहे. जुगाडू कमलेश म्हणतो की, तो सर्वप्रथम शेतकऱ्यांना 2000 मशीन देणार आहे. त्याचा रिझल्ट चांगला मिळाला तर त्यानंतर ते मार्केटमध्ये लाँच केले जाईल.