Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतरही शाहरुख ‘किंग’च; लोकप्रियता कायम, सिर्फ नाम ही काफी हैं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 12:09 PM2021-10-27T12:09:11+5:302021-10-27T12:14:18+5:30

Aryan Khan Drugs Case: आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण होऊनही शाहरुख खानच्या लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, असे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे.

विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खानला जामीन मिळण्यासाठी शाहरुख खान शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. या प्रकरणातून आर्यन खान बाहेर पडावा, यासाठी शाहरुख आटापिटा करताना दिसत आहे.

आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणानंतर काही बड्या कंपन्यांनी शाहरुख खानला आपल्या जाहिरातीतून वगळण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. आर्यन खान प्रकरण शाहरुखच्या ब्रँड इमेजला धक्का लागल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

असे असले तरी काहींच्या मते आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण होऊनही शाहरुख खानच्या लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. आजही शाहरुख खान बॉलिवूडचा किंग असून, शाहरुखची ही फेस तात्पुरती आहे. शाहरुख खान हा ब्रँडही कायम आहे.

एका रिपोर्टने म्हटले आहे की, बिझनेस क्षेत्रात शाहरुख खान एक मोठा ह्युमन ब्रँड आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे शाहरुखच्या काही जाहिरातींमध्ये घट झालेली असली तरी कॉर्पोरेट जगातील त्याची लोकप्रियता कायम आहे. इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ ह्युमन ब्रँड्सचे चीफ मेंटर संदीप गोयल यांनी म्हटले आहे की, शाहरुख खान सर्वांत पसंतीचे मानव ब्रँड आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे काही काळासाठी त्यावर विपरीत परिणाम झाला आहे. मात्र, असे असले तरी शाहरुखची लोकप्रियता कमी झालेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे शाहरुख पुन्हा एका जाहिरातींमध्ये झळकू लागला आहे, असे गोयल यांनी म्हटले आहे.

एका जाहिरात फर्मच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जाहिरात करणाऱ्या ब्रँड्सना शाहरुखचे व्यक्तिमत्त्व आणि आकर्षण यामुळे अनेक गोष्टी साध्य करता येतात. सर्व वयोगटातील दर्शकांमध्ये शाहरुख लोकप्रिय असल्याचा फायदा जाहिरातदार कंपन्या आणि जाहिरात करणाऱ्यांना होतो.

जाहिरातदारांसाठी शाहरुख एक लोकप्रिय पर्याय आहे. शाहरुखने डिश टीव्हीपासून ते डेनवर डियोड्रंडपर्यंत अनेक कंपन्या, ब्रँड आणि कंपन्यांसाठी जाहिराती केल्या आहेत. अलीकडेच कॅडबरी चॉकलेटने शाहरुख खानसोबत केलेल्या फेस्टिव्ह जाहिरातीचा दुसरा भाग सादर केला आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक झाल्यानंतर बायजूसने आपल्या जाहिरातीमधून शाहरुखला हटवण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, ड्रग्जसंदर्भात आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील एक नवीन चॅट समोर आले आहे. या चॅटमध्ये आर्यन खानने अनन्य पांडेच्या माध्यमातून गांजा अरेंज केला होता. तसेच या चॅटमध्ये NCB चा उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील धक्कादायक आणि आश्चर्यजनक व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट समोर आल्याचे म्हटले जात आहे. हा स्क्रीनशॉट एका ग्रुपमधील असून, यामध्ये आर्यन खानला कोकेन टुमॉरो याचा प्रस्ताव देण्यात आला असून, दुसऱ्या एका चॅटमध्ये NCB च्या नावाने आपल्या मित्रांना धमकावत असल्याचे समोर येत आहे.

Read in English