'मुलगा नाही' म्हणणाऱ्या नातेवाईकांना सडेतोड उत्तर; सेलिब्रिटी बहिणींनी आई-वडिलांसाठी खरेदी केलं कोटींचं पेंटहाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:07 IST2026-03-17T12:56:13+5:302026-03-17T13:07:34+5:30
मुलाची उणीव भासू नये म्हणून पालकांना दिलं आलिशान पेंटहाऊस; पाहा खास फोटो

समाजात आजही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव पूर्णपणे संपलेला नाही. आजही ज्या दांपत्याला मुली आहेत, त्यांना नातेवाईक किंवा शेजाऱ्यांकडून "म्हातारपणी तुमचा आधार कोण?" किंवा "मुली म्हणजे आई-वडिलांवरचं ओझं" असे बोचरे टोमणे ऐकावे लागतात. मात्र, याच बुरसटलेल्या मानसिकतेला आपल्या कर्तृत्वाने आणि यशाने चोख उत्तर दिले आहे ते बॉलीवूडमधील प्रसिद्ध मोहन बहिणींनी.

सुप्रसिद्ध गायिका नीती मोहन, नृत्यांगना शक्ती मोहन आणि अभिनेत्री मुक्ती मोहन या तिन्ही बहिणी मनोरंजन क्षेत्रात लोकप्रिय आहेत. या तिघींनी आपल्या आई-वडिलांना कधीही मुलाची उणीव भासू नये, यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांना कोट्यवधी रुपयांचे एक आलिशान तीन मजली पेंटहाऊस भेट दिले.

नुकतंच 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या भेटीत या नीती, शक्ती आणि मुक्ती यांनी त्यांच्या या 'ग्रीन होम'ची सफर घडवली.

कांदिवली येथील एका आलिशान इमारतीच्या २९ व्या मजल्यावर असलेले हे तीन मजली पेंटहाऊस आहे.

या घराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील हिरवळ. घरात जवळपास ४०० झाडे लावण्यात आली आहेत.

याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, "आमच्या आई-वडिलांना चार मुली आहेत, म्हणून या घरात ४०० झाडे आहेत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात निसर्गाचा स्पर्श जाणवेल".

मूळच्या दिल्लीच्या असलेल्या या कुटुंबाला मुंबईतही दिल्लीच्या घरासारखा अनुभव मिळावा, यासाठी घराची रचना विशेष पद्धतीने करण्यात आली आहे.

"आम्ही चार मुली असल्यामुळे नातेवाईक आम्हाला 'ओझं' म्हणायचे. आई-वडिलांना मुलगा नसल्याची खंत वाटू नये आणि त्यांनी एका मोठ्या घरात राजा-राणीसारखं राहावं, यासाठी आम्ही हे पेंटहाऊस त्यांना भेट दिलं" असे शक्तीने सांगितले.

नीती आणि मुक्ती यांचे लग्न झाले असून त्या आपापल्या संसारात सुखी आहेत. मात्र, शक्ती मोहन अजूनही अविवाहित आहे.

लग्नाबद्दल विचारले असता ती म्हणाली, "स्वतंत्र असण्याने मला आनंद मिळतो. मुक्तीच्या लग्नात नातेवाईकांनी लग्नासाठी खूप दबाव टाकला, पण मला माझं स्वातंत्र्य प्रिय आहे".

















