वानखेडे स्टेडियममध्ये काम करायची गश्मीरची आई; म्हणाल्या, "सहकाऱ्यांनी त्रास दिल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 03:16 PM2024-02-13T15:16:28+5:302024-02-13T15:51:17+5:30

माधवी महाजनी या वानखेडे स्टेडियममध्ये नोकरी करायच्या. तेव्हाची एक आठवणही त्यांनी पुस्तकात सांगितली आहे.

दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी आणि गश्मीर महाजनीची आई माधवी महाजनी यांनी काहीच दिवसांपूर्वी त्यांचं 'चौथा अंक' हे पुस्तक प्रकाशित केलं.

या पुस्तकात त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक बऱ्या वाईट प्रसंगाचा लेखाजोगा मांडला आहे. त्याबरोबरच बालपणीच्या आणि रवींद्र महाजनी यांच्याबरोबरच्या अनेक आठवणींनाही उजाळा दिला आहे.

माधवी महाजनी या वानखेडे स्टेडियममध्ये नोकरी करायच्या. तेव्हाची एक आठवणही त्यांनी या पुस्तकात सांगितली आहे.

त्या म्हणतात, "वानखेडे स्टेडियममधल्या स्टाफपैकी मी एकटीच पदवीधर होते. त्यामुळे तिथल्या काही मुलांच्या मनात माझ्याबद्दल आकस निर्माण झाला होता. आमच्या ऑफिसमध्ये दोनपेक्षा जास्त लेटमार्क असले की एक दिवसाचा पगार कापला जाई."

"त्यामुळे स्टाफची मुलं माझ्या नावापुढे लेट झाल्याचं दर्शवण्यासाठी लाल चौकोन करायची."

"एकदा मी ऑफिसमधून घरी आले तेव्हा एक पत्रकार रवीची मुलाखत घेण्यासाठी आला होता. सगळे काम नीट करत असताना माझे रेकॉर्ड कोणीतरी खराब करत असल्याचं मी रवीला सांगितलं."

"मुलाखत घेणारा तरुण मुलगा होता. त्याच्या कानावर आमचं संभाषण गेलं. त्याने आम्हाला काहीही न सांगता परस्पर बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नीला फोन केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने माझ्यासाठी त्यांची वेळ घेतल्याचं सांगितलं."

"आम्हाला कळल्यावर आम्ही त्याला म्हटलं, "अरे, एवढीशी गोष्ट थेट बाळासाहेबांना कशाला सांगायची...गरज नव्हती." पण, त्यांची अपॉइमेंट घेतल्यामुळे ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी सकाळी बाळासाहेबांकडे गेले."

"मी त्यांच्या घरी गेल्यावर बाळासाहेबांनी त्यांच्या त्या वेळच्या युनियन लीडर मोरेला घरी बोलावलं. आला तेव्हा तो जाम घाबरलेला होता. घाम पुसतच आला."

"बाळासाहेबांनी त्याला फैलावर घेतलं. "ह्या कोण आहेत माहितेय का? ह्यांच्या वाटेला कोणी गेलं तर बघा", असं ते म्हणाले. त्यानंतर मात्र मला ऑफिसमध्ये कुणीही त्रास द्यायला धजावलं नाही."