"अभिनेत्री असल्याने खूप पैसे मिळतात, तरी माझं मुंबईत घर नाही...', असं का म्हणाली प्रार्थना बेहेरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:55 IST2026-02-12T12:33:30+5:302026-02-12T12:55:43+5:30

"माझ्या मैत्रिणींची लाईफस्टाईल कदाचित तितकी ग्रेट नसेल...', असं का म्हणाली प्रार्थना बेहेरे?

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठी इंडस्ट्रीतला लोकप्रिय चेहरा आहे. तिचे घारे डोळे, तजेलदार त्वचा, आकर्षक फिगर यामुळे ती हिरोईन म्हणून शोभते.

प्रार्थनाने 'कॉफी आणि बरंच काही', 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'मितवा', 'व्हॉट्सअॅप लग्न' ते आता 'बाई गं', 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या सिनेमांमध्ये काम केलं. तसंच तिची 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिकाही तुफान गाजली.

प्रार्थना वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आली. तिची खऱ्या आयुष्यातील आलिशान लाईफस्टाईलचीही नेहमीच चर्चा होते. मात्र अशी लाईफस्टाईल आत्मसात करण्यासाठी किती खर्च होतो, तसंच अभिनेत्री म्हणून पैसे मिळतात का? या सगळ्यावर प्रार्थना पहिल्यांदाच सविस्तर बोलली.

'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थना म्हणाली, "हो, पैसे मिळतात..भरपूर मिळतात. माझं तरी आयुष्य लक्झरियस आहे. कदाचित माझ्या नवऱ्यामुळे असेल. पण शेवटी आपल्या गरजांवर ते अवलंबून असतं."

"मला इंडस्ट्रीत १५ वर्ष झाली पण माझ्या नावावर अजून घर नाही. माझ्या नावावर फक्त कार आहे. मी माझ्या गरजा काय ते पाहिलं. मला घर कधी महत्वाचं नव्हतं. इतर गोष्टी महत्वाच्या होत्या त्यामुळे मी त्यावर लक्ष दिलं. त्यावर पैसा खर्च केला."

"माझ्या लाईफस्टाईलवर जास्त पैसे खर्च केले. कारण मला हे तर माहित होतं की नवऱ्याचं घर असेलच ते माझंही घर. मग घरासाठी कशाला पैसा घालू? त्यामुळे कोणासाठी काय महत्वाचं असतं त्यावर सगळं अवलंबून आहे."

"आता माझ्या अशा खूप मैत्रिणी आहेत ज्यांना घर घेणं जास्त महत्वाचं होतं. लग्न, प्रेग्नंसी, मुलांना सांभाळणं हे त्यांचं प्राधान्य होतं. त्यांनी तिथे पैसा लावला लाईफस्टाईलमध्ये नाही. कदाचित त्यांमुळे त्यांची लाईफस्टाईल तेवढी ग्रेट नसेल. पण माझी लाईफस्टाईल अशी आहे आणि त्यावर मी खर्च करते."

"पण माझं स्वत:चं घर मुंबईत नाहीये हेही खरं आहे. गाडीही मी आत्ताच घेतली. आधी नवऱ्याच्या दोन गाड्या आहेत त्यातच मी फिरायचे. तसंच एक अभिनेत्री म्हणून लाईफस्टाईल मेन्टेन करायला लागते आणि या सगळ्यात खूप खर्च येतो."

"जेवढं मी कमावते ते सगळं मी लाईफस्टाईलवर घालवते. अगदी नखांपासून ते हेअर ड्रेसर, स्किन या सगळ्यासाठी किती पैसे लागतात. म्हणून तर अभिनेत्री एवढं कमावतात."