मूल नकोच..! प्रार्थना बेहेरे आणि तिच्या नवऱ्याने जाणीवपूर्वक का घेतला असा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 14:06 IST2026-02-08T14:02:18+5:302026-02-08T14:06:52+5:30

माझा मुलगा असता तर..., प्रार्थना बेहेरेने सविस्तर सांगितलं कारण

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने २०१७ साली दिग्दर्शक, निर्माता अभिषेक जावकरसोबत लग्न केलं. त्यांचा संसार किती आनंदात सुरु आहे हे त्यांच्या सोशल मीडियावरुन चाहते पाहतातच.

दोघांचं अलिबाग येथे आलिशान फार्म हाऊसही आहे. तिथे त्यांचे अनेक पाळीव श्वान आहेत. प्रार्थना अनेकदा त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असते.

दरम्यान प्रार्थना आणि अभिषेकने मूल न होऊ देण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला आहे. यामागचं कारण नुकतंच तिने एका मुलाखतीत सांगितलं.

आरपारला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थना बेहेरे म्हणाली,"मी लहान होते तेव्हा शेजारी राहणाऱ्या काकांकडे एक ज्युली नावाची पाळीव श्वान होती. मी सुद्धा तिच्याशी खूप खेळायचे. पण जेव्हा ती गेली तेव्हा ते काकू काकू खूप रडले."

"आम्हालाही वाईट वाटलं पण ते दोघं त्यांची मुलगी गेल्यासारखंच रडत होते. मला आणि आईला असं वाटलं की एवढं काय? प्राणीच तर आहेत ते..घरातली मुलगी गेल्यासारखे एवढं काय रडतायेत हे लोक..तेव्हा ते कळलं नाही."

"पण आज जेव्हा माझ्या घरी पाळीव श्वान आहेत त्यांच्या डोळ्यातलं प्रेम इतकं नि:स्वार्थी आहे..जोवर तुम्ही पाळणार नाही तोवर तुम्हाला ते कळत नाही. रस्त्यावरचे श्वान बघून त्यांच्या डोळ्यातही ते प्रेम दिसतं. ते इतकं खरं, नि:स्वार्थ प्रेम असतं ना.."

"त्यांना आपल्याकडून काहीही अपेक्षा नसतात. मला कधीकधी असं वाटतं की माझा मुलगा असता तर त्याला माझ्याकडून किती अपेक्षा असल्या असत्या. चांगली शाळा, चांगले कपडे असं त्याला वाटेल. म्हणजे माझ्या आईबाबांकडून होत्या तशाच करिअर घडवण्यासाठी असलेल्या अपेक्षा वगैरे."

"पण या पाळीव प्राण्यांना आपल्याकडून काही नको असतं. त्यांना फक्त प्रेम हवं असतं. हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे."

"माझं हे प्रेम इतकं वाढलंय ना की मी आणि अभिने जाणीवपूर्वक मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. हीच आमची मुलं आहेत आणि आम्ही ह्यांना ते प्रेम देऊ. ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत ना त्यांना कळेल की मी असं का बोलतीये. ज्यांच्याकडे नाहीये त्यांना ते नाही कळणार."