Laxmikant Berde Birth Anniversary : नाटकाचा पडदा ओढणाऱ्या ‘लक्ष्या’ची इन्सायरिंग गोष्ट...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 14:32 IST2021-10-26T14:22:51+5:302021-10-26T14:32:30+5:30

Laxmikant Berde Birth Anniversary : लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी झाला रत्नागिरी येथे झाला. आज त्यांची जयंती.

संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा आणि लोकांना हसवत ठेवूनच पडद्याआड गेलेल्या लक्ष्याची अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज जयंती. 1954 साली आजच्याच दिवशी म्हणजे 26 आॅक्टोबरला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म झाला होता.

26 आॅक्टोबर 1954 रोजी जन्मलेल्या लक्ष्यानं मोठा पडदा गाजवला. पण त्याआधी एका अजानत्या वयात लक्ष्मीकांत यांना काय व्हायचं होतं माहितीये? तर बसकंडक्टर.

होय, बसची तिकिटं फाडणाºया कंडक्टर जवळ पैशाची मोठी बॅग असते आणि हे ते सगळे पैसे त्याचे स्वत:चे असतात, असं लक्ष्याला बालपणी वाटे. त्यामुळे त्यालाही पैशाची बॅग मिरवणाºया या कंडक्टरसारखंच व्हायचं होतं. अर्थात ते बालपण होतं. समज आली आणि लक्ष्मीकांत यांना अभिनयानं झपाटलं.

होय, अगदी गिरगावातील गणेशउत्सव स्पर्धा, अंतरमहाविद्यालयीन स्पर्धा त्यांनी गाजवल्या. रंगभूमीवर अभिनय करण्याआधी नाटकाचा पडदा ओढण्याचं काम ते मोठ्या आवडीनं करायचे. पुढे नाटकाचा पडदा ओढण्याचं काम करणा-या या लक्ष्याने अख्खा पडदा व्यापला.

बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टूर टूर’ नाटकापासून आपल्या रंगभूमीवरच्या अभिनयाला सुरवात केली. हे नाटक प्रचंड गाजलं. त्यानंतर आलेला शांतेच कार्ट चालू आहे, बिघडले स्वगार्चे दार, कार्टी चालू आहे या नाटकांनी त्यांना नवी ओळख दिली.

पुढे मोठ्या पडद्यावरही तेच. मोठा पडदाही त्यांनी गाजवला. महेश कोठारेंच्या ‘धुमधडाका’ या चित्रपटातून त्यांना मोठा ब्रेक मिळाला.

खरं तर महेश कोठारे नाटकाची तालीम पाहायला गेले होते. पण लक्ष्मीकांत यांची भूमिका पाहून ते असे काही प्रभावित झाले की, त्यांनी तिथेच लक्ष्मीकांत यांच्या हातावर एक रूपया ठेवून त्यांना आपल्या सिनेमासाठी साईन करून घेतलं. हा सिनेमा होता ‘धुमधडाका’.

लक्ष्मीकात बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टी दीड ते दोन दशकं अक्षरश: धुमाकूळ घातला. यानंतर त्यांना हिंदी चित्रपटातही अनेक भूमिका केल्या. राजश्री प्रोडक्शनच्या ‘मैने प्यार किया’, ‘ हम आपके हैं कोण’ या चित्रपटात लक्ष्मीकांत यांनी भूमिका केल्या.

16 डिसेंबर 2004 साली किडनीच्या आजाराने लक्ष्मीकांत यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अकाली जाण्याने सगळ्या रसिकप्रेक्षक हळहळले नसतील तर नवल.