२०२२ मध्ये मराठी कलाकारांचीच चर्चा; कोणी गुपचूप तर कोणी धुमधडाक्यात बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 09:38 IST2022-12-30T09:30:42+5:302022-12-30T09:38:46+5:30

२०२२ वर्ष सरत आहे आणि २०२३ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत. या सरत्या वर्षात मराठी सिनेसृष्टीत लग्नाची गडबड जास्त दिसली. अनेक मराठी सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले.कोणकोणत्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली बघूया..

'सारेगमप' फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर २०२२ च्या सुरुवातीलाच लग्नबंधात अडकले. २३ जानेवारी रोजी पुण्यातील ढेपे वाडा येथे हा लग्नसोहळा पार पडला. रोहित आणि जुईली मराठी इंडस्ट्रीत प्रसिद्ध गायक गायिका आहेत. शिवाय सोशल मीडियावरही हे कपल सक्रिय आहे. दोघेही काही वर्ष लिव्ह इन मध्ये राहिले आणि जानेवारी महिन्यात त्यांनी लग्नगाठ बांधली.

महाराष्ट्राची क्रश 'फुलपाखरु' फेम हृता दुर्गुळे हिनेही २०२२ मध्ये लग्नाचा निर्णय घेतला आणि अनेक मुलांचे हार्टब्रेकच झाले. हृताने दिग्दर्शक प्रतिक शाह याच्यासोबत लग्न केले. प्रतिक आणि हृता अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. प्रतिक हा हिंदी मालिकांचे दिग्दर्शन करतो. बहु बेगम, बेहद २, कुछ रंग प्यार के ऐसे भी या काही लोकप्रिय मालिकांचे त्याने दिग्दर्शन केले आहे. तर त्याची आई मुग्धा शाह या हिंदी मालिकांमध्ये काम करतात. १८ मे २०२२ रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले.

मराठीतील क्युट कपल पैकी एक म्हणजे विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे. ३ मे रोजी पुण्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. विराजस आणि शिवानी एकमेकांना महाविद्यालयीन दिवसांपासून ओळखतात. विराजसने माझा होशील ना या लोकप्रिय मालिकेत मुख्य भुमिका साकारली तर शिवानी बन मस्का या मालिकेतून घराघरात पोहोचली.

अभिनेत्री नेहा कुलकर्णीने १६ ऑगस्ट रोजी ओमकार कुलकर्णी सोबत लग्नगाठ बांधली. नेहाने अगदी साध्या पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता लग्न करत सर्वांना सरप्राईज दिले. नेहाने अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. नुकतीच ती दृश्यम २ या सिनेमातही दिसली. ओमकार कुलकर्णी हा लेखक आणि अभिनेताही आहे.

टीव्हीतील रील लाईफ मधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणजे राणादा आणि पाठकबाई. हे कपल २०२२ मध्ये रिअल लाईफ मध्ये लग्नबंधनात अडकले. दोघेही खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात आहेत हे बघून चाहत्यांना फार आनंद झाला. २ डिसेंबर रोजी पुण्यात अगदी थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला.

टीव्ही अभिनेता पाहिले म नी तुला फेम आशय कुलकर्णीनेही लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. २ डिसेंबर रोजी त्याने दापोलीतील समुद्रकिनारी सानिया गोडबोले हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. सानिया ही एक डान्सर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही एकमेकांनी डेट करत होते. अखेर वर्षाच्या शेवटी त्यांनी लग्नगाठ बांधली.