"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:11 IST2025-07-14T10:43:11+5:302025-07-14T11:11:15+5:30
"निलेश साबळे असा आहे का? लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून...", निलेश साबळे स्पष्टच बोलला

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम गाजवणारा सूत्रसंचालक निलेश साबळे (Nilesh Sabale) काही दिवसांपूर्वी चर्चेत होता. राशीचक्रकार शरद उपाध्येंनी त्याच्यावर अनेक आरोप केले. त्यावर निलेश साबळेने व्हिडिओ शेअर करत उत्तरही दिलं होतं.
आता नुकतंच एका मुलाखतीत तो या प्रकरणावर सविस्तर बोलला आहे. असं का झालं? उत्तर देणं का गरजेचं होतं? यावर त्याने भाष्य केलं आहे.
'लोकशाही'ला दिलेल्या मुलाखतीत निलेश साबळे म्हणाला,"सन्माननीय शरद उपाध्येंनी याआधी तीन वेळा अशा पद्धतीने लिखाण केलं होतं. आधी मी दोन वेळा सोडून दिलं होतं. वर्तमानपत्रात मोठा लेख लिहिला होता त्यानंतर एक पोस्टही लिहिली होती."
"पण पुन्हा तेच आहे की कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं. ते व्यक्त व्हायला गेले तरी लोकांना प्रॉब्लेम आणि नाही झाला तरी लोक बोलतातच."
"पूर्वी असं नव्हतं. हल्ली सोशल मीडियामुळे आपण कोणाही व्यक्तीवर कमेंट करु शकतो. त्यामुळे आपण काही बोलायच्या आत लोक त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरु करतात. जज करायला लागतात."
"शरद उपाध्येंनी जेव्हा ते लिखाण केलं तेव्हा अनेकांचा असा सूर यायला लागला की, 'अरे निलेश साबळेंचा हा चेहरा आम्हाला माहितीच नव्हता', 'बरं झालं तुम्ही त्यांचा खरा चेहरा समोर आणलात','निलेश साबळे असा असेल माहितच नव्हतं' अशा लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या."
"मी माझी फार मोठी इमेज निर्माण केलीये असं मी म्हणत नाही. पण व्यवसायासाठी, तुम्ही करत असलेल्या कामासाठी तुमची एक इमेज असतेच. ती गरजेची असते. ती इमेज डागाळली गेली तर पुढच्या कामांवर त्याचा निश्चित परिणाम होईल."
"मला माझेच आजूबाजूचे लोक", नातेवाईक विचारायला लागले की तू असा वागला होतास? किती वेळ मी हे ऐकून घेणार? सगळ्याच मोठमोठ्या चॅनलने त्याची बातमीही केली."
"मग मी म्हटलं की ही एक बाजू लोकांना कळली आहे. नाण्याची दुसरी बाजू लोकांना सांगणं गरजेचं आहे नाहीतर ते तसंच राहील. सोशल मीडियावर अजून १० वर्षांनी पुन्हा ही बातमी पॉप होऊ शकते, परत चर्चा होते."
"मी डॉक्टर असल्याने मला माहित आहे की लोकांची मानसिकता कशी असते. एखादी मोठी व्यक्ती सांगते तेव्हा वाटतं की हे बरोबर आहे. मला वाटलं की आपण आपला मुद्दा प्रामाणिकपणे, शांतपणे मांडुया.
"शरद सरांनी त्यांचा मुद्दा माहिती घेऊन मांडायला हवा होता कारण त्यांच्याकडे असलेली माहित कदाचित चुकीची होती, गैरसमजातून झालेला प्रकार असेल एवढंच मला म्हणायचंय. मी आजही त्यांचा आदर करतो, आयुष्यभर करेन आणि उद्या ते समोर आले तरी मी त्यांच्याशी आदरानेच बोलेन. हा मुद्दा आता इथेच थांबवूया. कारण मागे जाण्यापेक्षा मला पुढे जायला आवडतं."