'इंग्लिश विंग्लिश' मधील श्रीदेवीची ऑनस्क्रीन मुलं आता कशी दिसतात? खऱ्या आयुष्यातही बहीण भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 12:08 PM2023-10-05T12:08:05+5:302023-10-05T12:25:33+5:30

खऱ्या आयुष्यातील भावा-बहिणीने साकारली होती श्रीदेवीच्या मुलांची भूमिका

श्रीदेवी यांच्या 'इंग्लिश विंग्लिश' (English Vinglish) सिनेमाला रिलीज होऊन आज तब्बल ११ वर्ष झाली आहेत. इतक्या वर्षांनीही हा सिनेमा अगदी काल बघितल्यासारखाच वाटतो. इंग्लिश विंग्लिशमधून श्रीदेवी यांनी १५ वर्षांनी कमबॅक केलं होतं.

सिनेमात श्रीदेवीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या दोघांच्याही अभिनयाचं कौतुक झालं होतं. यामध्ये श्रीदेवी यांना त्यांची मुलगी आणि नवरा इंग्रजी भाषा बोलता येत नाही म्हणून हिणवताना दिसतात. तर छोटा मुलगा मात्र निरागस असतो. तो त्याच्या आईच्याच बाजूने असतो.

सिनेमात नविका कोटिया (Navika Kotia) हिने श्रीदेवी यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तर शिवांश कोटिया (Shivansh Kotia) याने लहान भावाची भूमिका साकारली आहे. हे दोघं खऱ्या आयुष्यातही बहीण भाऊ आहेत.

नविका कोटियाने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'कसम से' या मालिकेतून तिने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. यानंतर 'बा बहू और बेबी','मर्यादा','ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकांमध्येही काम केलं.

सध्या नविका झी टीव्हीवरील 'क्यूँकी सास भी बहू बेटी होती है' मालिकेत काम करत आहे. ती केसर राजगौरी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. नविकाने 'स्कुल फ्रेंड्स' या ऐमेझॉन मिनी टीव्हीवरील सिरीजमध्येही काम केले आहे.

इंग्लिश विंग्लिश मधून नविकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने सपना ही भूमिका साकारली. याशिवाय तिने 'अत्तरिंतिकी दरेसी' या तेलुगू आणि 'मुरुगात्रुपडई' या तमिळ सिनेमातही काम केलं.

तर दुसरीकडे तिचा भाऊ शिवांश कोटिया याला आपण सगळ्यांनीच 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत नक्ष च्या भूमिकेत पाहिले होते. २०१२ ते २०१५ या कालावधीत त्याने मालिकेत काम केलं.तेव्हाच त्याने इंग्लिश विंग्लिश मध्येही भूमिका साकारली.

शिवांश नुकताच १८ वर्षांचा झाला आहे. नविका आणि शिवांशा या भावा-बहिणीत खूप खास बाँड आहे. सध्या शिवांश शिक्षणाकडे लक्ष देत आहे. दोघंही युट्यूब आणि इन्स्टाग्राम रील्सवरुन चाहत्यांचं मनोरंजन करत असतात.

नविका आणि शिवांश यांचे लेटेस्ट फोटो पाहिले तर हे तेच बालकलाकार आहेत हे ओळखणंही कठीण होईल. 'इंग्लिश विंग्लिश'चे हे भाऊ बहीण सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहेत.