धर्मेंद्र यांच्या भावाची खुलेआम सेटवर गोळ्या झाडून झालेली हत्या, कोण होते विरेंद्र देओल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:54 IST2025-11-25T16:49:30+5:302025-11-25T16:54:55+5:30

देओल कुटुंबातील तो काळा दिवस, धर्मेंद्र यांच्या भावाची सिनेमाच्या सेटवर गोळ्या घालून झाली होती हत्या

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचे काल ८९ व्या वर्षी निधन झाले. धर्मेंद्र यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

धर्मेंद्र हे पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील एका जाट शीख कुटुंबात जन्मलेले होते. त्यांचे खरे नाव धरम सिंग देओल होते आणि त्यांनी १९५८ मध्ये फिल्मफेअर टॅलेंट हंट जिंकल्यानंतर मुंबईत प्रवेश केला. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून झाली.

धर्मेंद्र यांनी तब्बल ६५ वर्षांच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांत काम केले. त्यांच्या अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. धर्मेंद्रप्रमाणेच देओल कुटुंबातील आणखी एक स्टार होता, जो लोकांच्या मनावर राज्य करत होता.

विशेष म्हणजे ८० च्या दशकात त्यांना धर्मेंद्र पेक्षाही मोठे सुपरस्टार मानले जायचे. ते धर्मेंद्र यांचे चुलत भाऊ विरेंद्र देओल हे होते. पण, त्यांची खुलेआम सेटवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

वीरेंद्र यांचा पहिला पंजाबी चित्रपट 'तेरी मेरी एक जिंदरी' १९७५ मध्ये प्रदर्शित झाला. त्यात धर्मेंद्र देखील होते, त्यांनी वीरेंद्र यांच्या भावाची भूमिका केली होती. हा चित्रपट हिट ठरला आणि वीरेंद्र यांची कारकिर्द चांगलीच रंगली.

वीरेंद्र सिंग देओल यांनी 'बटवारा', 'लांबरदारनी', 'बलबीरो भाभी' आणि 'दुश्मनी दी अग' सारखे हिट पंजाबी चित्रपट दिले. वीरेंद्र यांनी बॉलिवूडमध्येही काम केले. ज्यामध्ये 'दो चेहरे' आणि 'खेल मुकद्दर का' सारख्या चित्रपटांचा समावेश होता.

अभिनेता असण्यासोबतच ते लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते. १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी २५ चित्रपटांची निर्मिती केली आणि ते सर्व ब्लॉकबस्टर होते. धर्मेंद्र बॉलिवूडमध्ये तर विरेंद्र हे पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध होते. त्यांची ही लोकप्रियता त्यांच्यासाठी घातक ठरली.

६ डिसेंबर १९८८ रोजी वीरेंद्र हे 'जट्ट ते जमीन' चित्रपटाचे शूटिंग करत होते. अचानक कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा जीव घेतला. वीरेंद्रची हत्या कोणी केली किंवा त्यांची हत्या का केली? हे आजही एक गूढ आहे.

असे म्हटले जाते की वीरेंद्र यांची लोकप्रियता काही लोकांना खटकत होती. त्या काळात अतिरेक्यांच्या विचारसरणीशी जुळणारे लेखक, कलाकार किंवा कवी यांना लक्ष्य केले जात असे.

मृत्यूच्या वेळी वीरेंद्र ४० वर्षांचे होते. वीरेंद्र यांना रणदीप आर्य आणि रमनदीप आर्य ही दोन मुले असूनही ते दोघेही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांच्या दोन्ही सूना दीप्ती भटनागर आणि चंदना शर्मा देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.