वडिलांच्या इच्छेमुळे अभिनयात आला अन् रजनीकांतचा जावई झाला, साऊथमध्ये आहे दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 01:40 PM2023-07-28T13:40:23+5:302023-07-28T13:49:32+5:30

साऊथच्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस.

साऊथमध्ये कलाकारांना अगदी देवासारखंच मानतात. तिथे सिनेमांची मोठी क्रेझ पाहायला मिळते. साऊथ इंडस्ट्रीतही वर्षाला अनेक चित्रपट बनत असतात. तर आज साऊथच्या एका सुपरस्टारचा वाढदिवस. दिसायला अगदी साधा पण तेवढाच तगडा अभिनय करणारा धनुष (Dhanush) आज ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.

धनुषचा जन्म 28 जुलै 1983 रोजी तमिळनाडूमध्ये झाला. त्याचं खरं नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा होतं. धनुषचे वडील कस्तुरीराजा दिग्दर्शक आहेत. वडिलांच्याच सिनेमातून त्याने अभिनयात पदार्पण केलं होतं. धनुषला खरं तर आधीपासूनच शेफ बनायची इच्छा होती. हॉटेल मॅनेजमेंट करायचं स्वप्न त्याने पाहिलं होतं.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत धनुषचा भाऊ दिग्दर्शक बनला. त्यामुळे धनुषने अभिनेता व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. मोठ्या भावाचं आणि वडिलांचं ऐकून त्याने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्रवेश न घेता सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं. वयाच्या १९ व्या वर्षी त्याने वडिलांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'थुल्लुवधो इल्लामई' सिनेमातून पदार्पण केलं. याच सिनेमाच्या वेळी त्याने आपलं व्यंकटेश हे नाव बदलून धनुष केलं.

पहिल्या सिनेमातून धनुषला काहीच ओळख मिळाली नाही. तसंच आणखी कोणत्या फिल्मची ऑफरही आली नाही. म्हणून धनुषचा भाऊ सेल्वाराघवनने त्याच्या डायरेक्टोरियल डेब्यू फिल्म 'कढाल कोंडे' मध्ये धनुषला घेतलं. या फिल्मचे शूट बघायला आलेल्या लोकांनी धनुषला विचारलं फिल्मचा हिरो कोण आहे. तेव्हा धनुषला इतका आत्मविश्वास नव्हता की तो स्वत:ला हिरो म्हणेल. त्याला वाटलं की लोक त्याची खिल्ली उडवतील. म्हणून त्याने दुसऱ्या कास्ट मेंबरकडे इशारा केला.

सेटवर जेव्हा लोक हिरोला शोधत होते तेव्हा एका व्यक्तीने धनुषकडे हात केला. हे समजताच ते लोक जोरजोरात हसायला लागले. त्या ऑटोड्रायव्हरकडे पाहा तो हिरो आहे असं ते म्हणाले. ते लोक धनुषची खिल्ली उडवत होते. हे पाहून धनुष पळतच कारमध्ये गेला आणि खूप रडला. १९ वर्षांचा धनुष हा अपमान सहन करु शकला नाही.

४ जुलै २००३ रोजी 'कढाल कोंडे' रिलीज झाला. सिनेमा बघायला अनेक मोठ्या स्टार्सने हजेरी लावली. यावेळी थिएटर मालकाने धनुषची रजनीकांत आणि त्याच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्याशी ओळख करुन दिली. या एका भेटीतच त्याला ऐश्वर्या आवडली होती. याचं कारणही हे होतं की त्यावेळी ऐश्वर्या एकटक धनुषलाच बघत होती.

सिनेमा संपला दोघंही आपापल्या घरी गेले. या सिनेमामुळे धनुष स्टार बनला होता. त्याला सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. तर दुसऱ्या दिवशीच रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याने धनुषच्या घरी फुलं पाठवली. तसंच सोबत एक चिठ्ठीही पाठवली. त्यात लिहिले, तू फिल्ममध्ये खूप छान काम केलं आहेस. संपर्कात राहा.'

यानंतर दोघांमध्ये ओळख वाढली. दोघंही प्रतिष्ठित घरातून येतात त्यामुळे त्यांच्या अफेअरची चर्चा मनोरंजनविश्वास सुरु झाली. रजनीकांतला ही चर्चा समजताच ते नाराज झाले. त्यांनी धनुषला बोलावून दोघांचं लग्नच ठरवलं. दोघांनी 18 नोव्हेंबर 2004 रोजी लग्नगाठ बांधली. आणि अशा प्रकारे धनुष रजनीकांतचा जावई झाला.