BOLLYWOOD 2020 : दीपिकाचा ‘माल’ ते कंगनाचा ‘पंगा’, बॉलिवूडची खूप झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 14:16 IST2020-12-22T14:00:25+5:302020-12-22T14:16:31+5:30

2020 हे वर्ष कोरोनाचे वर्ष ठरले. पण सोबत अनेक वादांमुळेही हे वर्ष चर्चेत राहिले. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूडमधील काही वादांवरून जोरदार राडा झाला, इतका की अजूनही तो संपायला तयार नाही...

दीपिकाची जेएनयू भेट - जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी निदर्शने झाली होती. याचदरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोण जेएनयूमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी पोहोचली आणि सगळीकडे खळबळ माजली होती. दीपिकाच्या जेएनयू भेटीनंतर अनेकांनी तिच्या ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती. सोशल मीडियावर दीपिकावर नको इतकी टीका झाली होती. सोशल मीडियावर दीपिकाला ताबडतोब अटक करण्याची मागणी झाली होती काहींनी तर दीपिकाला थेट ‘अतिरेकी’ ठरवले होते.

कनिका कपूर आणि कोरोना- वर्षाच्या सुरुवातीला कनिका कपूर हे नाव वादात सापडले. कारण काय तर तिला झालेला कोरोना. बॉलिवूड सिंगर कनिका कपूर ही पहिली करोना झालेली सेलिब्रेटी होती. 20 मार्च 2020 रोजी तिला करोना झाल्याचे निदान झाले. यानंतर मात्र ती अचानक वादात आली. निमित्त होते तिने आयोजित केलेली पार्टी. कनिका कपूरने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अनेक दिग्गज हजर होते, ही माहिती लपवून तिने अनेकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप तिच्यावर झाला होता.

सुशांत ड्रग्ज केस - सुशांत राजपूतच्या मृत्यूनंतर सर्वाधिक चर्चेत आली ती अभिनेत्री रिया चक्रवर्ती. या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर याप्रकरणी रियाला अटक झाली. तिच्यावर वेगवेगळे आरोप झालेत. ती प्रचंड ट्रोल झाली.

ड्रग्ज अन् दीपिका, श्रद्धा, सारा - ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आल्यात. दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. या प्रकरणानंतर दीपिका प्रचंड चर्चेत आली. तिच्या चॅटमध्ये ‘माल’ हा शब्द आल्याने यावरून ती प्रचंड ट्रोल झाली.

कंगनाच्या ऑफिसवर बुलडोजर अन् ठाकरे सरकार - कंगना राणौतने मुंबईला पीओके म्हटले आणि वादाला तोंड फुटले. पाठोपाठ कंगनाच्या आॅफिसवर बुलडोजर चालला. मग काय कंगना चवताळली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत धमकी देण्यापासून तर बरेच काही तिने केले. यानंतर कंगना विरूद्ध ठाकरे सरकार असा ‘सामना’ पाहायला मिळायला.

‘पाताललोक’वर बहिष्कार - अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या ‘पाताललोक’ या वेबसीरिजवरून या वर्षांत रान माजले. या वेब मालिकेत एक जातीयवाचक दृश्य असल्याचे सांगत या वेबसीरिजला जोरदार विरोध करण्यात आला. याप्रकरणात अनुष्कालानोटीसही पाठवण्यात आली होती.

पंगा मत लेना...- सिंगर सोनू निगम आणि टी-सीरिजचा मालक यांच्यातील वाद या वर्षात सर्वांनी पाहिला. म्युझिक इंडस्ट्रीतही घराणेशाही असल्याचा आरोप सोनूने केला होता. शिवाय भूषण कुमार यांच्याविषयी गौप्यस्फोट करण्याचा इशारा सोनू निगमने दिला होता. पंगा मत ले, तेरा व्हिडीओ मेरे पास है, असे सोनू म्हणाला होता. त्यावरून सोनू निगम कृतघ्न असल्याची टीका भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसला कुमार हिने केली होती. हे प्रकरणही खूप गाजले होते.

मुकेश खन्ना आणि कपिल शर्मा शो- कपिल शर्माचा शो सर्वात वाह्यात शो आहे, अशी टीका मुकेश खन्ना यांनी केली होती. यावरून ‘भीष्म पितामह’ मुकेश खन्ना आणि ‘धर्मराज युधिष्ठिर’ गजेंद्र चौहान यांच्यातील ख-या आयुष्यातील हे ‘महाभारत’ चर्चेचा विषय बनले होते. कपिल शर्मा शोमध्ये सहभागी होण्यावरून हा वाद सुरु झाला आणि बघता बघता एकमेकांची उणी दुणी काढण्यापर्यंत पोहोचला होता. याच वादाच्या पार्श्वभूमीवर गजेंद्र चौहान यांनी मुकेश खन्ना यांना फ्लॉप अ‍ॅक्टर म्हणत, त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. मुकेश खन्ना यांनी त्याला उत्तर देत, चलो, दुनिया को दिखाते हैं कि इंडस्ट्री में तुम्हारी क्या इज्जत है और मेरी क्या, असे म्हणत गजेंद्र चौहान यांच्यावर निशाणा साधला होता.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ सिनेमावरून मोठ्या वादाला तोंड फुटले होते. नावामुळे हा सिनेमा वादात अडकला होता. आधी या सिनेमाचे नाव लक्ष्मी बॉम्ब असे होते. यावरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत असल्याची तक्रार करण्यात आली होती. यावरून अक्षय प्रचंड ट्रोल झाला होता. इतका की, त्याला सिनेमाचे नाव बदलावे लागले होते.

कंगना-दिलजीत वाद - वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली होती. आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबच्या एका वयोवृद्ध महिलेची खिल्ली उडवणारे ट्वीट तिने केले होते. यावरून कंगना व अभिनेता दिलजीत दोसांज यांच्यात प्रचंड जुंपली होती. हे सोशल वॉर अद्यापही सुरु आहे.

Read in English