आयुष्मान खुरानाचे 'जबरा फॅन' आहात? मग अभिनेत्याचं खरं नाव काय सांगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:24 PM2023-09-14T12:24:01+5:302023-09-14T12:38:41+5:30

ट्रेनमध्ये गाणी गाऊन मिळालेल्या पैशात आयुष्मानने गोवा ट्रिप केली होती.

बॉलिवूडमध्ये आपल्या हटके अभिनयाने आणि गाण्याने सर्वांना प्रेमात पाडणारा अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana). आयुष्मान एक उत्तम अभिनेता तर आहेच पण चांगला गायकही आहे. आज अभिनेता ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

आयुष्मानबद्दल अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अचंबित करतील. आयुष्मानने सुरुवातीला रेडिओ जॉकीचे काम केले आहे. आधीपासूनच आवाज चांगला असल्याने त्याला गाण्याचीही आवड होतीच. त्याने ट्रेनमध्येही गाणी गाऊन पैसे कमावले आहेत.

करिअरच्या सुरुवातीला आयुष्मान रेडिओ जॉकी होता. तेव्हा त्याने शाहरुख खानसह अनेक स्टार्सची मुलाखत घेतली आहे. यानंतर त्याने थिएटर आणि अभिनयाला सुरुवात केली. फिल्ममध्ये येण्याआधी त्याने ४-५ वर्ष थिएटरमध्ये काम केले.

२००४ साली आयुष्मानने mtv च्या Roadies सिझन 2 मध्ये सहभाग घेतला. यासाठी झालेल्या मुलाखतीत त्याने ट्रेनमध्ये गाणी गाऊन पैशांची व्यवस्था केल्याचं सांगितलं होतं. कॉलेजमध्ये असताना दिल्ली ते मुंबई पश्चिम एक्सप्रेसमध्ये त्याने गाणी गायली आणि त्यातून मिळालेल्या पैशांनी गोवा ट्रिप केली होती.

बॉलिवूडमध्ये बराच स्ट्रगल केल्यानंतर त्याला 'विकी डोनर' सिनेमा मिळाला. यात त्याने स्पर्म डोनरची भूमिका केली होती. आयुष्मानने खऱ्या आयुष्यातही स्पर्म डोनेट केले आहे. २० वर्षांचा असतानाच त्याने स्पर्म डोनेट केल्याचं Roadies मध्ये सांगितलं होतं.

सिनेमा रिलीज होण्याआधी त्याने वडिलांच्या सांगण्यावरुन आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला. आयुष्मान खुरानाचं स्पेलिंग Ayushman Khurana असं लिहिलं जातं. मात्र यात बदल करत त्याने Ayushmann Khurrana असं करुन घेतलं.

पण खरी गंमत तर ही आहे ती आयुष्मानचं खरं नाव वेगळंच आहे. जन्मानंतर त्याचं नाव निशांत ठेवलं होतं. वडिलांनीच लेकाचं हे नाव ठेवलं होतं. मग निशांत तीन वर्षांचा असताना वडिलांनीच त्याचं नाव बदललं. आयुष्मान या नावामुळेच मुलाला यश मिळेल असं वडिलांना वाटलं.

आयुष्मानने 'अंधाधून','बरेली की बर्फी','आर्टिकल 15' या सिनेमांमधूनही आपल्या अभिनयाची छाप पाडली. नुकताच त्याचा 'ड्रीम गर्ल 2' रिलीज झाला असून त्याच्या भूमिकेचं कौतुक होतंय.