गोल्ड मेडलिस्ट अमिषाने वडिलांनाच खेचलं होतं कोर्टात, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 11:37 AM2023-06-09T11:37:26+5:302023-06-09T11:55:07+5:30

अमिषा पटेलबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सिनेमाने तिला रातोरात स्टार केले.

यानंतर तिच्या 'गदर' सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. सिनेमातील तिची आणि सनी देओलची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. आता तब्बल २२ वर्षांनी 'गदर 2' सिनेमा काही महिन्यात रिलीज होतो. याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

पण अचानक अमिषाच्या आयुष्यात असा टर्न आला जिथे ती सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्रींच्या भूमिकेतच दिसायला लागली. प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच ती जास्त चर्चेत आली. तिचं नाव विक्रम भट यांच्यासोबत जोडलं जाऊ लागलं. मात्र अचानक त्यांचं नातं तुटलं.

इतकंच नाही तर अमिषाचे तिच्या कुटुंबासोबत वाद सुरु झाले ज्यामुळे ती चर्चेत आली. तिने आपल्या वडिलांविरोधातच १२ कोटी रुपयांच्या हेराफेरीचे आरोप लावले होते. वडील पैशांचा गैरवापर करत असल्याचा खुलासा तिने केला. तिने वडिलांना लीगल नोटीस पाठवत कोर्टातही खेचले.

2009 मध्ये अमिषा पटेल तिचा भाऊ अश्मित पटेलसोबत एका सिनेमागृहात दिसली. तेव्हा तिचं कुटुंबासोबतचं नातं पुन्हा सुरळीत झाल्याची चर्चा सुरु झाली. नंतर अमिषाच्या आईने एका मुलाखतीत सांगितलं की आता त्यांच्यात सगळं काही ठीक आहे.

2002 मध्ये आलेल्या 'हमराज' सिनेमानंतर तिचं करिअर फारसं चाललं नाहीच.हमराज हिट झाला तरी नंतर तिला फारसे चांगले चित्रपट मिळाले नाही. तिने तेलुगू, तमिळ सिनेमांमध्ये काम केले मात्र तिथेही तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. तिने 'बिग बॉस 13' मध्येही सहभाग घेतला होता.

अमिषाचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईतच झालं. नंतर तिने अमेरिकेतील टफ्ट्स विश्वविद्यालयातून अर्थशास्त्रात उच्चशिक्षण घेतलं. त्यावेळी तिने अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये गोल्ड मेडल पटकावलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.