'या' बॉलिवूड अभिनेत्यासाठी युद्ध थांबवण्यास तयार होती अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची लेक, वडिलांना म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:37 IST2025-05-09T18:31:33+5:302025-05-09T18:37:15+5:30

बॉलिवूड अभिनेत्यासाठी जेव्हा अफगाण राष्ट्रपती आणि बंडखोरांनी थांबवलं होतं गृहयुद्ध!

भारत आणि पाकिस्तानातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत-पाक युद्धाच्या (India-Pakistan War) पार्श्वभुमीवर एक जुना किस्सा चर्चेत आला आहे.

तुम्हाला माहितेय का बॉलिवूडच्या एका अभिनेत्यासाठी अफगाणिस्तानात (Afghanistan) युद्ध थांबवण्यात आलं होतं.

ते अभिनेते होते महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). ही ९० च्या दशकाची गोष्ट आहे. 'खुदा गवाह' चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमिताभ बच्चन हे अफगाणिस्तानला (Amitabh Bachchan in Afghanistan) गेले होते.

अमिताभ यांच्या आगमनाची बातमी ऐकून तत्कालीन अफगाण राष्ट्रपती मोहम्मद नजीबुल्लाह यांच्या मुलीने आपल्या वडिलांना एक विशेष विनंती केली होती.

ती म्हणाली होती, "मुजाहिदीनांशी बोलून एक दिवसासाठी युद्ध थांबवा, कारण भारतातून इतका मोठा स्टार अफगाणिस्तानात आला आहे. जर लढाई थांबली तर तो काबूलला भेट देईल आणि लोक त्यालाही पाहू शकतील". ही माहिती अफगाणिस्तानच्या माजी राजदूताने भारतातील एका प्रसिद्ध पत्रकाराला दिली होती.

'खुदा गवाह'चे शूटिंग काबूल आणि मजार-शरीफ येथे झालं. तिथल्या सरकारने अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था केली होती. जेव्हा जेव्हा अमिताभ बच्चन आणि त्यांची टीम चित्रपटाच्या शूटिंगसाठी हॉटेलमधून बाहेर पडायची, तेव्हा पाच अफगाण सैन्याच्या टँकचे काफिले त्यांच्या पुढे आणि पाच त्यांच्या मागे असायचे.

एवढंच काय तर एके दिवशी विरोधी पक्षनेते बुरहानुद्दीन रब्बानी यांनी अमिताभ यांना संदेश पाठवला होता. त्या संदेशामध्ये त्यांनी ते अमिताभ यांचे मोठे चाहते असल्याचं सांगितलं. तसेच अमिताभ किंवा चित्रपट युनिटच्या कोणत्याही सदस्याला घाबरण्याची गरज नाही. कोणालाही कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही, असा शब्द दिला होता.. तसेच बुरहानुद्दीन रब्बानी स्वतः फुले घेऊन अमिताभ बच्चन यांना भेटायला आले होते.

'खुदा गवाह'चे चित्रपटाचे निर्माते मनोज देसाई यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, अमिताभ बच्चन आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे चांगले मित्र होते आणि त्यांनीच अमिताभ बच्चन आणि त्यांच्या चित्रपट युनिटसाठी अफगाण सरकारशी बोलणी केली हतोी. १९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या झाली आणि 'खुदा गवाह' हा चित्रपट १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

रशीद किडवाई यांनी त्यांच्या 'नेता अभिनेता: बॉलिवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स' या पुस्तकात अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांच्यातील मैत्रीचा उल्लेखही केला आहे. पुस्तकात त्यांनी लिहलं की, "दिल्लीमध्ये 'खुदा गवाह'ची लाँच पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्या पार्टीत अमिताभ बच्चन यांना राजीव गांधींची आठवणीत रडू कोसळलं होतं".

'खुदा गवाह' या सिनेमात अभिताभ बच्चन यांच्यासोबत श्रीदेवीदेखील मुख्य भूमिकेत होत्या.