'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:44 IST2025-11-10T14:44:13+5:302025-11-10T14:44:53+5:30
जितेंद्र कुमारच्या आईच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
'पंचायत' सीरिज फेम अभिनेता जितेंद्र कुमारच्या अभिनयाचे सगळेच चाहते आहेत. सीरिजमध्ये त्याने सचिवजींच्या भूमिकेतून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तसंच 'कोटा फॅक्टरी' मधलीही त्याची जितू सर ही भूमिका गाजली. जितेंद्र कुमारने काही हिंदी सिनेमेही केले. आयुष्मान खुरानासोबत त्याचा 'शुभमंगल जादा सावधान' सिनेमा गाजला होता. तसंच नुकताच तो अर्शद वारसीसोबत 'भागवत' या खलनायकाच्या भूमिकेत दिसला. आता जितेंद्रच्या नवीन हिंदी सिनेमाची घोषणा झाली आहे.
कबूतरबाजी संस्कृतीवर सिनेमा येणार आहे. यामध्ये जितेंद्र कुमार मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेत्री पूजा भट त्याच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. नॉट आऊट एंटरटेन्मेंट या प्रोडक्शन हाऊस पेजने इन्स्टाग्रामवर सिनेमाची घोषणा केली आहे. जितू आणि पूजाचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, 'दोन दमदार कलाकार. एक सुंदर कहाणी. कबूतर-बाजीवर एक भावनिक कथा घेऊन येत आहोत. भारताची जुनी कबुतर उडवण्याची परंपरा यावर सिनेमा आधारित आहे. पूजा भट आणि जितेंद्र कुमार मायलेकाच्या भूमिकेत आहेत. ख्याती मदानने सिनेमाची निर्मिती केली आहे.
जितेंद्र आणि पूजाच्या या नवीन सिनेमासाठी चाहते आतुर आहेत. सिनेमाचा विषयही अगदी हटके आहे. सध्या सिनेमाची फक्त घोषणा झाली असून रिलीजसाठी वाट पाहावी लागणार आहे. बिलाल हसन यांनी सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. तर हितेश केवले सिनेमाचे सहनिर्माता आहेत.