"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:40 IST2025-05-07T13:35:13+5:302025-05-07T13:40:19+5:30
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यामातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा चांगलाच तीळपापड झालेला दिसतोय. तिने भारताविरोधात केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे

"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतानेपाकिस्तान आणि pok मध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या ९ तळांना उद्धवस्त केले. या एअर स्ट्राईकमध्ये १०० हून जास्त दहशतवादी ठार झाले, असं सांगण्यात येतं. भारतातील तमाम नागरीकांनी या एअर स्ट्राईकचं कौतुक करुन भारतीय सेनेचं अभिनंदन केलंय. पण या हल्ल्यामुळे पाकिस्तानी अभिनेत्रीचा मात्र चांगलाच तीळपापड झालेला दिसतोय. पाकिस्तानी अभिनेत्रीने भारताला दोष देऊन या हल्ल्याबद्दल पोस्ट लिहिली आहे.
पाकिस्तानी अभिनेत्रीने सोशल मीडियावर केला राग व्यक्त
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने तिच्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. हानियाने लिहिलंय की, "मी कोणत्याही पाकिस्तानी माणसाला पहलगाम हल्ल्याचा जल्लोष करताना पाहिलं नाही. परंतु असंख्य भारतीय या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निर्दोष लोकांच्या हत्येचा आनंद साजरा करत होते. माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. माझ्याकडे फक्त राग, चीड आणि दुखावलं गेलेलं मन आहे. एक मुलगा जग सोडून गेला. त्याचं कुटुंब उध्वस्त झालं. हे कशासाठी?"
हानिया आमिर पुढे लिहिते की, "तुम्ही या पद्धतीने कोणाची सुरक्षा नाही करु शकत. ही एक प्रकारची क्रूरता आहे. निर्दोष लोकांवर बाँब हल्ला करुन तुम्ही याला स्ट्रॅटेजी म्हणू शकत नाही. ही ताकद नाही तर भ्याडपणा आहे. आम्ही तुम्हाला बघतोय." हानिया आमिरनंतर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने सुद्धा तिचा राग व्यक्त केला आहे. माहिरा म्हणाली की, "हा अत्यंत भ्याड हल्ला आहे. अल्लाह आमच्या देशाची सुरक्षा करेन. सद्बुद्धी येवो. आमीन."