इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा सुखरुप; लवकरच पोहोचणार भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 10:25 AM2023-10-08T10:25:03+5:302023-10-08T10:30:25+5:30
Nushrat bharucha: इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतसोबत संपर्क झाला असून ती तिथे सुखरुप आहे.
सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन (israel hamas palestine war) यांच्यामध्ये युद्धपरिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागले. या हल्ल्यात इस्रायलमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. इतकंच नाही तर अनेक इस्रायल सैनिक आणि नागरिकांना ओलीसही ठेवण्यात आलं आहे. यामध्येच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (nushrat bharucha) इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती समोर आली. त्यामुळे कलाविश्वासह सगळेच जण अस्वस्थ झाले. मात्र, आता तिच्याविषयी एक चांगली माहिती समोर आली आहे. नुसरत सुखरुप असून लवकरच ती मायदेशी परतणार आहे.
लवकरच भारतात परतणार नुसरत
इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतसोबत नुकताच संपर्क झाला असून ती तिथे सुखरुप आहे. इतकंच नाही तर भारतात परत येण्यासाठी ती एअरपोर्टवर पोहोचली आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये नुसरत लवकरच मायदेशी सुखरुपपणे पोहोचणार आहे. मात्र, जोपर्यंत नुसरत सुखरुपरित्या घरी येत नाही तोपर्यंत तिचे कुटुंबीय, चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत
इस्रायलमध्ये कशी अडकली नुसरत?
नुसरत भरुचा हाइफा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायल येथे गेली होती. नुसरत भरुचाशी शनिवारी दुपारी १२.३० वाजता शेवटचा संपर्क करण्यात आला होता. ती त्याठिकाणी एका बेसमेंटमध्ये असून सुरक्षित असल्याचे कळालं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव आणखी माहितीचा खुलासा केला जाऊ शकत नाही. परंतु तेव्हापासून अद्याप तिच्याशी संपर्क होत नसल्याचे मीडियाला सांगितलेल्या निवेदनात म्हटलं होतं.
हमासने केला इस्रायलवर हल्ला
शनिवारी पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने अवघ्या २० मिनिटांत इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागले. या हल्ल्यात आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याचबरोबर अनेक इस्रायली सैनिक आणि नागरिकांना ओलीस ठेवल्याचा दावा हमासने केला आहे. इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात १९८ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे १५०० जखमी झाले. हमासने संपूर्ण नियोजनासह इस्रायलला लक्ष्य केले, ज्यासाठी ते बऱ्याच काळापासून तयारी करत होते.