अभिनेत्री आकांक्षा दुबे मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट; तिची हत्या झालीय, आईचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 13:35 IST2023-03-27T13:34:30+5:302023-03-27T13:35:22+5:30
वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये रविवारी भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री आकांक्षा दुबेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

अभिनेत्री आकांक्षा दुबे मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट; तिची हत्या झालीय, आईचा दावा
वाराणसी - भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे हिच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता तिच्या आईने गंभीर आरोप केला आहे. आकांक्षा दुबेची आई मधू दुबे यांनी मुलीची हत्या गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंहने केल्याचा आरोप केला आहे. माझ्या मुलीने सुसाईड केलं नाही तर तिची हत्या या दोघांनी मिळून केलीय असा दावा अभिनेत्रीच्या आईने केला आहे.
आकांक्षा दुबेची आई म्हणाली की, समर सिंह आणि संजय सिंह यांनी आकांक्षा दुबेचे मागील ३ वर्षापासून कोट्यवधीचे काम करून पैसे रोखले होते. २१ तारखेला समर सिंहचा भाऊ संजय सिंहने आकांक्षा दुबेला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आकांक्षाने स्वत: मला याबाबत फोन करून माहिती दिल्याचं आईने सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळणं लागले आहे.
आकांक्षा दुबेचा रहस्यमय मृत्यू
वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये रविवारी भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री आकांक्षा दुबेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. सुरुवातीला तिने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात होता. परंतु त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. आकांक्षा परसीपूरची राहणारी होती. आकांक्षा दुबे आत्महत्या करू शकत नाही असं तिच्या घरच्यांनी सांगितले आहे.
IPS बनवण्याची होती कुटुंबाची इच्छा
आकांक्षा दुबे ३ वर्षाची असतानाच आई वडिलांसह मुंबईत शिफ्ट झाली होती. आकांक्षाला आयपीएस अधिकारी बनवण्याचं तिच्या वडिलांचे स्वप्न होते. परंतु तिला डान्स आणि अभिनयाची आवड होती. लहानपणापासून तिला टीव्ही बघण्याची आवड होती. त्यानंतर मॉडेलिंग करत तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीत करिअर करण्याचं ठरवले.
वयाच्या १७ व्या वर्षी एका मैत्रिणीच्या सहाय्याने आकांक्षाने भोजपुरी सिनेमात पाऊल ठेवले. दिग्दर्शक आशी तिवारी यांच्यासोबत काही सिनेमांमध्ये तिने काम केले. अनेकदा आकांक्षाला रिजेक्शनचाही सामना करावा लागला. २०१८ मध्ये आकांक्षा मानसिक तणावाखाली आली होती. तिने इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आकांक्षाच्या आईने तिची समजूत घातल्यानंतर तीने पुन्हा काम सुरू केले.