‘नाना’कळांची अभिनयश्रीमंत चित्रकृती!

By Admin | Published: January 2, 2016 08:28 AM2016-01-02T08:28:49+5:302016-01-02T09:11:31+5:30

नाटकाचे चित्रपटात माध्यमांतर होताना त्या नाटकाची तुलना त्या चित्रकृतीशी केली जाणे स्वाभाविकच आहे. विशेषत: मराठी रंगभूमीवरील सुवर्णपान असलेल्या ‘नटसम्राट’ यासारख्या नाटकावर

'Nana' of the actress! | ‘नाना’कळांची अभिनयश्रीमंत चित्रकृती!

‘नाना’कळांची अभिनयश्रीमंत चित्रकृती!

googlenewsNext

- राज चिंचणकर

नटसम्राट (मराठी चित्रपट)

नाटकाचे चित्रपटात माध्यमांतर होताना त्या नाटकाची तुलना त्या चित्रकृतीशी केली जाणे स्वाभाविकच आहे. विशेषत: मराठी रंगभूमीवरील सुवर्णपान असलेल्या ‘नटसम्राट’ यासारख्या नाटकावर जर चित्रपट बेतलेला असेल, तर या तुलनात्मक प्रक्रियेत वाढ होणेही साहजिकच आहे. त्यामुळे वि.वा.शिरवाडकर यांचे ‘नटसम्राट’ हे नाटक थेट चित्रपट माध्यमातून येणार म्हटल्यावर आशा-अपेक्षांचे ओझेही अधिक जड होते. नाटकाचा चित्रपट होताना त्यात ‘नाटक‘ दिसू नये ही तर तारेवरची कसरतच; पण ‘नटसम्राट’ या चित्रपटाने ही कसरत कमालीच्या सफाईने हाताळली आहे. परिणामी, नाटक व चित्रपट यांची तुलनाच होणार नाही, इतके संचित या चित्रपटाने गाठीशी बांधले आहे.
अभिनय हा या चित्रपटाचा आत्मा आहे आणि यातली प्रत्येक व्यक्तिरेखा त्याच्याशी एकरूप झालेली आहे. पण या चित्रपटाचा कळस म्हणावा लागेल, तो म्हणजे गणपतराव बेलवलकर यांची भूमिका पेलणारे नाना पाटेकर ! आतापर्यंत त्यांच्या विविध भूमिकांतून त्यांचे ‘नाना’पण समोर येत गेले असले, तरी या नटसम्राटाची भूमिका म्हणजे नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे शिखर म्हणावे लागेल. हातचे काहीही राखून न ठेवता त्यांनी यात उभ्या केलेल्या नटसम्राटामुळे या चित्रपटाला ‘नाना’कळांची अभिनयश्रीमंत चित्रकृती असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
एक काळ रंगभूमी गाजवून सोडणारा गणपत हा नट, आता वार्धक्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. तनमनात ‘नाटक’ एके ‘नाटक’ भिनलेला हा नट रंगभूमीपासून दूर होऊनही नाटकापासून स्वत:ला वेगळे काढू इच्छित नाही.
आयुष्याचा प्रत्येक क्षण तो नाटक म्हणूनच जगतो. त्याचे हे जगणे बिनधास्त, बेधडक आणि थेट आहे. वार्धक्याच्या खुणा त्याच्या शरीरावर उमटल्या आहेत, पण त्याची नाळ रंगभूमीशी घट्ट जुळलेली आहे. त्याच्या या आयुष्याचा पट हा चित्रपट मांडतो. ही मांडणी करताना त्याचे कौटुंबिक जीवनही तो रेखाटतो. किंबहुना, त्याच्या या कुटुंबामुळे या नटाची सामान्य आयुष्यातली विविध रूपे दृगोच्चर होत जातात.
नटाला ‘चौथ्या अंकाचा’ शाप असतो असे म्हटले जाते आणि या चित्रपटातही त्याची दखल घेतली आहे. पण ही दखल जरा जास्तच झाली आहे. या अतिरंजितपणामुळे ‘नटसम्राट’च्या या व्यक्तिरेखेला धुसर का होईना, पण डाग लागला आहे. मात्र असे असले, तरी नाना पाटेकर यांच्या अस्तित्वापुढे हे सगळे ‘पण’ गळून पडले आहेत हेही तितकेच खरे !
चित्रपटाचा पूर्वार्ध जरा रेंगाळत असला, तरी त्याची कमतरता उत्तरार्धात केवळ भरूनच आली आहे असे नव्हे; तर हा उत्तरार्ध कळसाला गवसणी घालणारा ठरला आहे. ‘नटसम्राट’ नाटकातली काही स्वगतंही यात आहेत आणि ती नाट्यस्वगतं न वाटता चित्रपटात अचूक सामावून गेली आहेत. नाटक वेगळे आणि चित्रपट वेगळा, हे ठसवण्याचे काम हा चित्रपट करतो.
साहजिकच, नाटकाशी या चित्रपटाची तुलना करण्याचा प्रश्नच निकालात निघतो. पटकथाकार महेश मांजरेकर व अभिजीत देशपांडे यांनी त्यानुसार केलेली कामगिरी फत्ते झाली आहे. अभिजीतसह संवादलेखन करणारे किरण यज्ञोपवित यांचीही कामगिरी सरस आहे. अजित रेड्डी यांचे छायांकन, तसेच एकनाथ कदम यांचे कला दिग्दर्शन नजरेत भरणारे आहे आणि त्यामुळे हा नटसम्राट पडद्यावर उत्तम दिसतो.
नाना पाटेकर यांच्यासारखा चतुरस्त्र अभिनेता समोर असताना इतर भूमिकांमध्ये असलेल्या कलावंतांना ‘नाना’प्रकारचे प्रश्न आपसूक पडतात. पण इथे या सर्व कलावंतांनी त्यांना दिलेली साथ उल्लेखनीय ठरावी. नटसम्राटाची पत्नी, कावेरीच्या भूमिकेत मेधा मांजरेकर यांनी कणखरपणे उभे राहून त्याची पावती दिली आहे. अर्थात, लेखनातच या व्यक्तिरेखेकडून फार काही भरीव अपेक्षा नसल्याने ही कावेरी नटसम्राटाच्या हाताला हात लावून वावरताना दिसते. नाना पाटेकर यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात त्यांच्या मित्राची, अर्थात रामची भूमिका साकारणारे विक्रम गोखले हे होय. अतिशय अनोखा बाज पकडत त्यांनी रंगवलेली ही व्यक्तिरेखा त्यांच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा हटके आहे. एका अथार्ने विक्रम गोखले व नाना पाटेकर यांच्या अभिनयाची तगडी जुगलबंदी यामुळे चित्रपटात दिसते. मात्र विक्रम गोखले यांच्या वाट्याला मोजकेच प्रसंग आहेत; पण त्याही वेळेत त्यांनी अफलातून काम करून ठेवले आहे.
सुनील बर्वे (राहुल), मृण्मयी देशपांडे (विद्या), नेहा पेंडसे (नेहा), अजित परब (मकरंद) या व अशा इतर कलावंतांची योग्य साथ या नटसम्राटाला लाभली आहे. एक उत्तम चित्रानुभूती देणारा हा
चित्रपट अनेकदा पापण्यांच्या कडा ओलावून टाकतो; तर कधी अश्रूंची सीमारेषाही ओलांडायला लावतो. पण त्यातच या शोकांतिकेचे सामर्थ्य आहे आणि त्यातच या नटसम्राटाचे जगणे आहे.

नटसम्राटाची व्यक्तिरेखा तर या चित्रपटात अस्सल उतरली आहेच; परंतु त्याचबरोबर मूळ नाटकात नसलेल्या नटसम्राटाच्या मित्राच्या व्यक्तिरेखेचे चित्रपटात केलेले प्रयोजनही सर्वांगसुंदर आहे. कारण या योजनेमुळे चित्रपट मूळ नाटकापासून वेगळा भासण्यास आपोआप मदत झाली आहे. माध्यमांतर करताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेले हे चित्रपट स्वातंत्र्य कुठेही ठिगळ लावल्यासारखे वाटत नाही. उलट ते एक महत्त्वाचे पात्र बनून जाते.

‘नटसम्राट’ म्हटला की त्याच्यासोबत येणारा त्याचा औरा, त्याची त्यात असलेली मश्गुलता आलीच; पण त्यातून त्याला बाहेर काढत त्याच्या नटसम्राटपदाला जमिनीवर आणण्याचे काम या मित्राच्या व्यक्तिरेखेची योजना करून अचूक साध्य झाले आहे. ही सगळी भट्टी चांगली जुळून आली असली, तरी यात काही पण, परंतु आहेत.

Web Title: 'Nana' of the actress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.