मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:33 IST2025-11-22T16:32:01+5:302025-11-22T16:33:33+5:30
वैयक्तिक आयुष्याविषयी मुक्ता बर्वे म्हणाली...

मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
मराठी प्रेक्षकांची सर्वात आवडती आणि लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे. गेल्या २५ वर्षांपासून मुक्ता विविध माध्यमांतून आणि भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मराठीतली ताकदीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तीनही क्षेत्रात ती आघाडीवर आहे. मुक्ता प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर असली तरी वैयक्तिक आयुष्यात ती वयाच्या ४६ व्या वर्षीही अविवाहित आहे. मुक्ताने अद्याप लग्न का केलं नाही असा प्रश्न तिला नेहमीच विचारला जातो. यावर नुकतंच आता तिने उत्तर दिलं आहे.
सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत मुक्ता बर्वे म्हणाली, "मी या प्रश्नाचं उत्तरच देत नाही. मला कोणी समोर येऊन विचारतही नाही. मला वाटतं तशी गरजही नाही कारण कोणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी का विचारावं आणि कोणी आपल्या खाजगी आयुष्याविषयी का उत्तर द्यावं. केवळ मी समाजमाध्यमात काम करते म्हणून कोणीही मला काहीही विचारु शकेल असा त्याचा अर्थ नाही."
ती पुढे म्हणाली, "माझं वैयक्तिक आयुष्य मी माझ्या कामापेक्षा कायमच लांब ठेवलं. ते एकत्र करण्याची मला गरजही वाटत नाही. जोपर्यंत त्याचा माझ्या जगण्या वागण्यावर परिणाम होत नाही तोवर तो माझा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो आदरपूर्वक लोकांनीही जपला पाहिजे. माझ्याबाबतीत लोक ते नेहमीच जपतात. पूर्वी ते गंमत म्हणून विचारलं जायचं कारण तेव्हा स्थळं यायची आणि ती अजूनही येतात. पण त्याची चर्चा किंवा तो विषय असू नये कारण वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच खाजगी असतं आणि माझं क्षेत्र म्हणून जे काम आहे ते वेगळं आहे."
मुक्ता बर्वेचा नुकताच 'असंभव' हा मराठी सिनेमा रिलीज झाला आहे. यामध्ये तिच्यासोबत सचित पाटील, प्रिया बापटही आहेत. हा एक थरारक सिनेमा आहे. सोबतच मुक्ता आता हिंदीतही ऑडिशन्स देत आहे. वेबसीरिज, हिंदी सिनेमांमध्येही तिला एक्स्प्लोर करायचं असल्याचं ती काही मुलाखतींमध्ये म्हणाली. मुक्ताला आणखी नव्या भूमिकांमध्ये आणि हिंदीतही पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक आहेत.