नवीन वर्षाची 'लय भारी' सुरुवात! केबीसीच्या निमित्ताने बिग बींसोबत झळकली मिथिला पालकर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:00 IST2026-01-01T14:56:14+5:302026-01-01T15:00:01+5:30
मिथिला पालकरची महानायक अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा पूर्ण, पोस्ट शेअर करत म्हणाली...

नवीन वर्षाची 'लय भारी' सुरुवात! केबीसीच्या निमित्ताने बिग बींसोबत झळकली मिथिला पालकर, म्हणाली...
Mithila Palkar Meets Amitabh Bachchan : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना एकदा तरी प्रत्यक्ष भेटता यावं असं अनेक कलाकारांचं स्वप्न असतं. त्यातून त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली तर दुग्धशर्करा योगच. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील क्युट अभिनेत्री मिथिला पालकरच्या आयुष्यात हा योग आला. अमिताभ बच्चन यांना भेटण्याची मिथिलाची अनेक वर्षांची एक इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली.
मिथिला पालकर हिच्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत स्वप्नवत झाली. मिथिला ही लवकरच 'हॅप्पी पटेल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मिथिला 'कौन बनेगा करोडपती'मध्ये पोहचली. यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉटसीटवर बसून खेळ खेळण्याची संधी तिला मिळाली. मिथिलासाठी हा क्षण खूप खास होता. अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर मिथिलाने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला.
मिथिला म्हणाली, "लहानपणापासून त्यांना जादू करताना पाहत मी मोठी झाले. हा शो पाहतच मोठी झाले आणि आज त्यांच्यासोबत याच शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. हे आयुष्य जगता येतंय, यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे". मिथिलाच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.
कधी पाहता येणार हा भाग?
मिथिला पालकर आणि अमिताभ बच्चन यांचा हा खास भाग आज, १ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना मिथिला आणि बिग बी यांना एकत्र पाहायला मिळणार आहे.