" अॅम्ब्युलन्स नव्हती अन् मित्रांनी प्रेत मांडीवर...", काय घडलेलं दादा कोंडकेंच्या मृत्यूच्या रात्री? अनिता पाध्येंनी सांगितला 'तो' प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:16 IST2025-08-20T17:03:24+5:302025-08-20T17:16:49+5:30
"मी दादांच्या प्रेताजवळ एकटीच होते...", अनिता पाध्येंनी सांगितला दादा कोंडकेंच्या मृत्यूचा भावुक प्रसंग

" अॅम्ब्युलन्स नव्हती अन् मित्रांनी प्रेत मांडीवर...", काय घडलेलं दादा कोंडकेंच्या मृत्यूच्या रात्री? अनिता पाध्येंनी सांगितला 'तो' प्रसंग
Dada kondke: मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके आणि त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. दिलखुलास व्यक्तिमत्व, प्रभावी अभिनय, आणि लक्षवेधी संवादफेक यामुळे कायम प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या या अभिनेत्याचं नाव आजही कलाविश्वात मोठ्या अदबीने घेतलं जातं. मराठी चित्रपटांतल्या विनोदी संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. 'सोंगाड्या',' पांडू हवालदार' तसेच 'आंधळा मारतो डोळा',' पळवा पळवी' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी धाटणीच्या भूमिका साकारल्या. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ सिने-पत्रकार अनिता पाध्ये यांनी दादा कोंडकेंसोबतच्या निधनाच्या दिवसाबद्दल सांगितलं आहे.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अनिता पाध्ये यांनी दादा कोंडकेंच्या काही आठवणी शेअर केल्या. दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या जीवनावर आधारित एकटा जीव नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलं आहे. या मुलाखतीत त्या म्हणाल्या,"अगदी अचानक दादांचं निधन झालं. रात्री पाऊणेतीन वाजता त्याचे जीतू भाऊ जे मॅनेजर होते त्यांचा फोन आला. तेव्हा ते मला म्हणाले की, ताई दादांची प्रकृती बिघडली आहे. आम्ही त्यांना सश्रृषा
हॉस्पिटलमघ्ये घेऊन जातोय तर तुम्ही याल का? जे चार लोक काम करायचे,दादा त्यांच्याबरोबच राहायचे. तर मी लगेच त्यांना येते असं सांगितलं. त्यानंतर मी लगेच माझ्या भावाला उठवलं आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तिथे त्यांना कॉरिडोअरमध्ये स्ट्रेचरवर ठेवलं. तेव्हा डॉक्टर तिथेच असल्यांने मी त्यांना विचारलं की काय झालं. तर त्यांनी हार्ट अटॅक आला असं सांगितलं. मी डॉक्टरांना म्हणाले की तुम्ही हार्ट पंपिग वगैरे करुन बघा. पण, त्याचा काही अपयोग होणार नाही कारण,त्यांना जाऊन १० मिनिटं झाली आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं."
पुढे त्या म्हणाल्या,"मग मी माझ्या भावाला सांगितलं की, तू या लोकांबरोबर घरी जा आणि दादांच्या नातेवाईकांना फोन कर.दादांची बहीण पुण्याला राहायची. शिवाय त्यांचे असिस्टंट कोल्हापूरला राहायचे. नंतर दादांना घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सची गरज होती. हॉस्पिटलच्या दारात ॲम्ब्युलन्स उभी होती.पण,तेथील लोक म्हणाले की फॉर्म भरावा लागेल, ते रजिस्टर लॉकरमध्ये आहे, आता ड्राइव्हर नाही.त्या काळात मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्स नव्हत्या. एक शिवसेनेची ॲम्ब्युलन्स होती. पण, ती आम्हाला मिळाली नाही.त्यानंतर मी पहिला फोन विजय कोंडकेंना केला. कारण, किती काही झालं तरी आम्ही बाहेरची माणसं होतो.रक्ताचे नातेवाईक ते होते. दादांच्या शेवटच्या काळात विजय कोंडकेबरोबर त्यांचे संबंध चांगले नव्हते. पण, मी त्यांना फोन केला आणि त्यांना दादांच्या निधनाबद्दल सांगितलं. याशिवाय दादांचे जवळचे दोन मित्र होते, त्यांना मी फोन केला.साबीर शेख त्यावेळी कामगार मंत्री होते. त्यांनाही मी फोन केला, तर ते अंबरनाथला होते.या सगळ्यात हॉस्पिटलमध्ये दोन तास मी दादांच्या प्रेताजवळ एकटी होते."
बाळासाहेब ठाकरे दादांच्या प्रेताजवळ बसले होते...
"तेव्हा दादांची कॉन्टेसा गाडी होती. कॉन्टेसा गाडीचा मागचा भाग रुंद असतो. त्या गाडीत दादांचे दोन मित्र आणि मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन गेलो. कारण, अॅम्बुलन्स नव्हत्या. एक अॅम्बुलन्स दारात उभी होती तर दुसरी उपलब्ध नव्हती. त्यावेळेला इतक्या सोयी नव्हत्या. दादा बालमोहनच्या गल्लीत एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहायचे. आम्ही दुसऱ्या मजल्यावर प्रेत घेऊन गेलो आणि संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांचे सगळे नातेवाईक, बहिणी, हिंदी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील तसेच राजकीय क्षेत्रातील लोक आले होते. छगन भुजबळ यांनी तेव्हा शिवसेना सोडली होती पण दादांसाठी ते तिथे आले होते. बाळासाहेब ठाकरे आले होते. तिथे आल्यानंतर ते कोणाशी बोलले नाहीत. ते दादांच्या प्रेताजवळ बसले होते.त्यांच्या कपाळावरुन हात फिरवत होते.कारण,त्यांची खूप वर्षांची मैत्री होती." असं अनिता यांनी मुलाखतीत सांगितलं.