'त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही'; भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 09:44 AM2023-11-20T09:44:53+5:302023-11-20T09:46:21+5:30

Jitendra joshi: टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे जितेंद्रने पोस्ट शेअर करत भारतीय संघाला पाठिंबा दिला आहे.

world-cup-india-vs-aus-final-match-jitendra-joshi-shares-emotional-post-after-india-lost-final-match | 'त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही'; भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट

'त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही'; भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट

सलग दहा सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेली रोहित शर्मा (rohit sharma) आणि त्याची टीम जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून हरली.  त्यामुळे १२ वर्षानंतरही भारताची वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा पुन्हा एकदा अपूर्ण राहिली. सलग १० सामने जिंकलेल्या टीम इंडियाचा ऐन अंतिम फेरीत पराभव झाल्यामुळे भारतीय प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. अनेकांनी त्यांची नाराजी व्यक्त करत टीम इंडियाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.  परंतु, या सगळ्या नाराजीच्या वातावरणात अभिनेता जितेंद्र जोशी (jitendra joshi) याने टीम इंडियासाठी केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली आहे.

जितेंद्रने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत टीम इंडियावर (team india) नाराजी व्यक्त करणाऱ्यांना चांगलं सुनावलं आहे. "आता पराभवानंतर काहीजण आपल्या संघाबद्दल वाईट कमेंट करतील , त्यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा करतील, टीका करतील, काही नेटकऱ्यांनी तर आधीच बालिश मीम्स बनवले आहेत. पण,  या सगळ्या सीरिजमध्ये आपल्या संघाने उत्तम कामगिरी केली हे आपण विसरुन चालणार नाही. आपल्या टीमचा मला प्रचंड अभिमान आहे.  कारण,एकही सामना न गमावता त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. आपण यंदा जिंकू असा विश्वास आपल्यात निर्माण केला, आपल्याला स्वप्न दाखवली. आपण सगळेच एक प्रेक्षक आणि कुटुंब म्हणून एकत्र खेळलो", असं जितेंद्र जोशी म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "शेवटी हा एक खेळ आहे. कोणा एकाला जिंकण्यासाठी कोणाला तरी हार मानावीच लागते. हा दिवस जरी आपला नसला तरी सुद्दा आपली टीम खूप छान खेळलेली आहे. आता मी दु:खी आहे. पण, त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही. त्यांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. आपल्या सगळ्यांच्या वतीने ते मैदानात खेळले. या विश्वचषकात आपण उत्तम ठरलो नाही याचा अर्थ आपण हरलोय असा होत नाही. माझा माझ्या टीमला कायम पाठिंबा आहे. मी कायम त्यांच्यासोबत आहे."

दरम्यान, टीम इंडियाला सपोर्ट करत जितेंद्रने ऑस्ट्रेलिया संघाचंदेखील अभिनंदन केलं आहे. तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं खेळलात असंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जितेंद्र जोशीप्रमाणेच अनेक मराठी कलाकारांसह बॉलिवूड स्टार्सनेही सोशल मीडियावर व्यक्त होत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: world-cup-india-vs-aus-final-match-jitendra-joshi-shares-emotional-post-after-india-lost-final-match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.