'माझे बाबा मला सोडून गेले तेव्हा…', सखी गोखलेनं सांगितला भावुक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 07:19 PM2023-05-15T19:19:27+5:302023-05-15T19:20:01+5:30

Sakhi Gokhale : सखी गोखले हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.

'When my father left me...', Sakhi Gokhale recounted the emotional experience | 'माझे बाबा मला सोडून गेले तेव्हा…', सखी गोखलेनं सांगितला भावुक अनुभव

'माझे बाबा मला सोडून गेले तेव्हा…', सखी गोखलेनं सांगितला भावुक अनुभव

googlenewsNext

जगभरात काल मातृदिन साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक कलाकारांनी ‘मदर्स डे’ निमित्त पोस्ट शेअर केल्या आहेत.  अभिनेत्री सखी गोखले हिने जीवनातील आपली पहिली कथाकार असलेल्या आपल्या आईबद्दल, म्हणजे प्रसिध्द अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्याबद्दल आपला एक वैयक्तिक अनुभव सांगितला. यातून आपल्या मूल्ये कशी बनली आणि हा अनुभव आजही आपल्या मनात कसा ताजा आहे, ते सखी गोखलेने सांगितले.

सखी गोखलेच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘झी’च्या टीमने जेव्हा माझ्याकडे त्यांनी बनविलेला हा सुंदर चित्रपट पाठविला, तेव्हा लहानपणापासून माझ्या अम्माने मला सांगितलेल्या अनेक गोष्टींनी माझ्या मनात गर्दी केली. माझी आई उत्कृष्ट कथाकार आणि नकलाकार आहे. ती तुम्हाला तासन् तास खुर्चीवर खिळवून ठेऊ शकते. तिच्या गोष्टी कधी संपतच नाहीत आणि त्या ऐकताना हसून हसून तुमच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागते. माझ्या या मताशी सहमत होणारे अनेक लोक मला ठाऊक आहेत. पण या सर्वांतून माझ्या मनात एक अनुभव अगदी ताजा राहिला आहे. तो म्हणजे जेव्हा तिने मला प्रथमच मृत्यू या संकल्पनेची ओळख करून दिली. ही गोष्ट कदाचित इतरांच्या मनात भयानक भावना निर्माण करू शकते. पण लहानपणी आपण प्रथम केव्हा मृत्यू या संकल्पनेबद्दल ऐकलं, हे आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल. मृत्यूच्या संकल्पनेबरोबरच आपल्या मनात भीती या संकल्पनेचाही जन्म होत असतो. माझे बाबा मला सोडून गेले, तो काळ मला स्पष्टपणे आठवतो.

ती पुढे म्हणाली की, एक लहान मूल म्हणून त्यांचा मृत्यू हा मला गोंधळात टाकणारा होता. त्यावेळी त्यांच्या मृत्यूची बातमी सहा वर्षांच्या एका मुलीला सांगताना अम्मा म्हणाली, “आपल्यात वावरणारी काही माणसं ही परमेश्वराची मुलं असतात. ती खास आणि सुंदर असतात. त्यांना आपल्यासाठी एक भेट म्हणून देवाने पाठविलेले असते. पण देवालाच जेव्हा एकाकी वाटते, तेव्हा तो या मुलांना आपल्याकडे बोलावून घेतो. कारण त्याला त्या मुलांचा सहवास हवा असतो. त्यामुळे अशा सुंदर मुलांचा जो काही थोडाफार सहवास आपल्याला लाभला, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानायला हवेत. आपण त्यांचं स्मरण करून त्यांचा सहवास साजरा केला पाहिजे.” आता जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा तिने मला मृत्यूबद्दल किती सहजतेने समजावलं, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटतं. मला नेमकं काय ऐकायचं आहे, हे तिला कसं समजलं?

तिने सांगितलेली ती केवळ एक कथा नव्हती, तर ती माझ्या मनाची घडण करीत होती. ही घडण कशी झाली, त्याचा मी आजही शोध घेत असते. आई ही एक जादुगार असते. मला असं जीवन दिल्याबद्दल आणि त्यात तुझी जादू जोडल्याबद्दल तुझे मी आभार मानते, अम्मा! आय लव्ह यू. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Web Title: 'When my father left me...', Sakhi Gokhale recounted the emotional experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.