"वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण" म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींवर मराठी दिग्दर्शकाचा संताप, पल्लवी जोशींचाही घेतला समाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:01 IST2025-08-19T18:00:58+5:302025-08-19T18:01:19+5:30
विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवणाला नावं ठेवत 'गरिबाचं जेवण" असं म्हटलंय. यावरून आता वाद निर्माण झालाय.

"वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण" म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींवर मराठी दिग्दर्शकाचा संताप, पल्लवी जोशींचाही घेतला समाचार
'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटातून देशभरात नाव कमावणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या एका वादग्रस्त विधानामुळे टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी मराठी खाद्यसंस्कृतीची खिल्ली उडवल्यामुळे समाजमाध्यमांवर त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत अग्निहोत्रींसह त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्यावर टीका केली आहे.
महेश टिळेकर यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कुठं गेला विवेक? 'कश्मीर फाईल' सिनेमाचे मोफत शो आयोजित करून विवेक अग्निहोत्री याला आर्थिक हातभार लावणारे मराठी नेते, त्याच अग्निहोत्रीने 'मराठी जेवण हे गरिबांचे जेवण ' असा उल्लेख केल्यावर त्या अग्निहोत्रीच्या कानाखाली 'अग्नि' काढणार की तिथे नवरा मराठीची इज्जत काढत असताना शेजारी दात विचकत बसलेल्या पल्लवी जोशीचा साडी चोळी असा 'माहेरचा आहेर' देऊन सत्कार करणार ?" या थेट शब्दांत अग्निहोत्रींच्या विधानावर टिळेकर यांनी प्रहार केला.
काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
'कर्ली टेल्स'च्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवण हे 'गरिबांचं आणि शेतकऱ्यांचं जेवण' असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांनी सांगितलं की, लग्नानंतर पल्लवी जोशी यांनी जेव्हा त्यांच्यासाठी वरण भात बनवला, तेव्हा त्यांनी हा पदार्थ 'गरिबांचं जेवण' असल्याचं म्हटलं. हे सांगत असताना ते हसताना दिसले, तर पल्लवी जोशी यांनीही त्यांच्या या विधानाला हसण्यावारी घेतल्याचं दिसून आलं. त्यांच्या या वागण्यामुळे मराठी लोक संतप्त झाले असून, अनेकांनी समाजमाध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.