किशोर कदम, अतुल परचुरे, भाऊ कदम या दमदार कलाकारांचा जिंदगी विराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:33 IST2017-09-27T11:03:37+5:302017-09-27T16:33:37+5:30
संपूर्ण कुटुंबाचे निखळ मनोरंजन होईल असे कथासूत्र, उच्च निर्मितीमूल्ये आणि कथानकाला न्याय देणारे कलाकार आणि तंत्रज्ञ ही मराठी चित्रपटांची ...

किशोर कदम, अतुल परचुरे, भाऊ कदम या दमदार कलाकारांचा जिंदगी विराट
>संपूर्ण कुटुंबाचे निखळ मनोरंजन होईल असे कथासूत्र, उच्च निर्मितीमूल्ये आणि कथानकाला न्याय देणारे कलाकार आणि तंत्रज्ञ ही मराठी चित्रपटांची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. अंजनेय साठे एन्टरटेनमेंट निर्मित ‘जिंदगी विराट’ हा चित्रपट देखील असाच उच्च निर्मितीमूल्ये, उत्तम कथासूत्र असणारा चित्रपट आहे.
सुमित संघमित्र दिग्दर्शित ‘जिंदगी विराट’ या चित्रपटाची कथा ही गावातल्या एका अतरंगी मुलाची कथा आहे. त्याचे वडील गेल्यानंतर त्यांची शेवटची इच्छा अपुरी असल्याचे लक्षात येते. ही इच्छा नेमकी काय आहे हे शोधण्यासाठी आणि तिची पूर्तता करण्यासाठी घातलेला घाट म्हणजे हा सिनेमा आहे. त्यामुळे या इच्छापूर्तीच्या प्रवासात घडणारे प्रसंग, पात्र, त्यांच्या गंमती जंमती, अडचणी या सर्व गोष्टींच्या अवतीभवती हा सिनेमा घडतो. त्यामुळे प्रथमदर्शनी चित्रपटाचा विषय जरी गंभीर वाटत असला तरी सिनेमाची धाटणी अतिशय हलकी आणि विनोदी स्वरूपाची आहे हे चित्रपटाच्या ट्रेलरवरून आपल्या लक्षात आले असेलच. सुमित संघमित्रने लिहिलेल्या संवादांमुळे सिनेमा अतिशय मर्मविनोदी झाला आहे. जगण्याची बाप गोष्ट सांगणारा हा चित्रपट बाप आणि मुलगा यांच्यामधील नात्यावर बेतलेला असला तरी बाप आणि मुलगा या नात्याबरोबरच दोन मित्रांमधील मैत्रीचे बंधदेखील उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला गेला आहे.
नावाप्रमाणेच चित्रपटाची स्टारकास्ट देखील अतिशय विराट आहे. या चित्रपटात ओम भूतकर, सुमित संघमित्र या तरुण कलाकारांना किशोर कदम, अतुल परचुरे, भाऊ कदम, उषा नाईक या दिग्गज कलाकारांची बहारदार साथ लाभणार आहे.
मराठी चित्रपटाचे संगीत हा चित्रपटाचा प्राण असतो. जिंदगी विराट मधील ‘मल्हार...’ आणि ‘मखमली...’ या गाण्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळत आहे. यातील ‘मल्हार’ या गाण्याला तर सोशल मिडीयावर ४ मिलियनहून’ अधिक ‘व्ह्यूज’ मिळाले आहेत. या गाण्यांच्या यशाचे श्रेय सुरज-धीरज या नवोदित संगीतकार जोडीला जाते आणि या त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सोनू निगम, श्रेया घोषाल, विशाल दादलानी, जावेद अली यांसारखे दिग्गज गायक लाभले आहेत.
या चित्रपटाच्या लोकेशनमध्येदेखील वेगळेपण आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसणारे टुमदार गाव कोणताही सेट नसून ते नाशिकमधील कळवण तालुक्यामधील कातळगाव आहे आणि चित्रपटामुळे या गावाला आता ‘निसर्गरम्य शूटिंग लोकेशन’ अशी नवीन ओळखदेखील मिळाली आहे.
संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून बघता येईल असा जगण्याची बाप गोष्ट सांगणारा धमाल चित्रपट ‘जिंदगी विराट’ आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
Also Read : अमरीश पुरी यांचा नातू बनला मराठी चित्रपटाचा निर्माता!
Also Read : अमरीश पुरी यांचा नातू बनला मराठी चित्रपटाचा निर्माता!