उर्मिला कोठारेनं येरवडा कारागृहातील महिला कैद्यांसोबत नवरात्री साजरी केली, शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:02 IST2025-10-01T17:01:50+5:302025-10-01T17:02:24+5:30
उर्मिला कोठारे हिने पुण्यातील येरवडा कारागृहातील फोटो शेअर केले आहेत.

उर्मिला कोठारेनं येरवडा कारागृहातील महिला कैद्यांसोबत नवरात्री साजरी केली, शेअर केले फोटो
उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या मेहनतीच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. ती अभिनेत्रीसोबत उत्तम डान्सरदेखील आहे. उर्मिला सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतीच तिने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
उर्मिला कोठारेनं येरवडा जेलमधील महिला कैद्यांसोबत नवरात्र उत्सव साजरा केला. महिला कैद्यासोबत नवरात्र उत्सव साजरा करण्याचा अनुभव तिनं पोस्टमधून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. उर्मिलाने पारंपरिक निळ्या साडीतील सुंदर लूक असलेले फोटो शेअर केले आहेत. या उत्सवात महिला कैद्यांसोबत हसणे आणि आनंद वाटण्याचा अनोखा अनुभव तिला घेता आला. कैद्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आनंद पाहून अभिनेत्री स्वतःही भावूक झाली. हा अनुभव तिला खऱ्या अर्थाने उत्सवाची खरी ओळख समजून देणारा ठरला, असे तिने सांगितले.
'माहेर प्रतिष्ठान'चे मानले आभार
उर्मिलाने कॅप्शनमध्ये लिहिले, "आज नवरात्र उत्सव येरवडा जेलच्या महिला कैद्यांसोबत साजरा करण्याचा योग आला. त्यांच्या हसण्यात शब्दांपेक्षा जास्त भावना होत्या… आणि तीच खरी उत्सवाची ओळख. माहेर प्रतिष्ठानचे मनापासून आभार;... त्यांच्यामुळेच हा अनुभव जगता आला". दरम्यान, विविध सेवाभावी संस्थेमार्फत धार्मिक, सामाजिक, मनोरंजनात्मक, समुपदेशपर असे उपक्रम महिला कैद्यांसाठी राबविण्यात येतात.
उर्मिला ही महेश कोठारेंची सून आहे. महेश कोठारेंचा मुलगा आणि अभिनेता आदिनाथ कोठारेबरोबर तिने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगी आहे. अनेकदा उर्मिला लेकीबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते.