"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 09:56 IST2025-08-09T09:55:12+5:302025-08-09T09:56:27+5:30
Ruchita Jadhav : रक्षाबंधननिमित्त अभिनेत्री रुचिता जाधव हिने भावासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
आज देशभरात मोठ्या उत्साहात भावा-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण रक्षाबंधन साजरा केला जातो आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. मात्र यंदा मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री रुचिता जाधव (Ruchita Jadhav) रक्षाबंधन सण साजरा करु शकत नाही आहे. त्या निमित्ताने तिने भावासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
रुचिता जाधवने तिचा भाऊ भूषण जाधवसोबतचे जुन्या अविस्मरणीय क्षणांचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्या व्हिडीओवर तिने लिहिले की, यावर्षी मी राखीला तुझ्याजवळ नाहिये. मनात खूप काही आहे रे. तुझ्या कपाळावर ओटी ठेवावी. हातात राखी बांधावी आणि नेहमीसारखं भांडाभांड करुन मिठी मारावी. पण कधी कधी आयुष्य अशा वळणावर नेतं. जिथे मन घराकडे धावतं. पण पाय जबाबदाऱ्या थांबवतात. सासरच्या दारात पाय दिला खरा. पण माहेरच्या आठवण आठवणी रोज मनात घर करतात आणि तो तर मनातला एक कोपरा कायम तुझ्यासाठी राखून ठेवलाय. कितीही दूर गेलास तरी माझं तुझ्यावरचं प्रेम हे वेगळंच. एक राखी नाही बांधली म्हणून आपलं नातं काय कमी होईल का रे? नाही. कारण माझं भाऊ बहिणींचं नातं हे शब्दांच्या पलीकडचं आहे. नजरेआड आहोतच आहोत. पण मनाच्या अगदी जवळचं आहे. या राखीला मिठी नाही पण आठवणी आहेत आणि अंतःकरणाच खोलवर जपलेलं प्रेम आहे. राखी आली आणि गेली पण बहीण पण कधीच जात नाही रे.
रुचिताने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, राखी आहे…पण मिठी नाही. जी बहिण भावाजवळ नाही पोहचू शकली, ती त्याचं प्रेम विसरली असं नाही…नातं दोरीवर नाही, भावना आणि काळजावर टिकलेलं असतं… भूषण जाधव. दूरवरून प्रेम करणाऱ्या प्रत्येक बहिणीला आणि भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. रुचिताच्या पोस्टवर तिच्या भावानेही कमेंट केली आहे. त्याने लिहिले की, "माझ्यासाठी तू फक्त मोठी बहीण नाहीस, तर एक मैत्रीण, मार्गदर्शक आणि माझी दुसरी आई आहेस."
वर्कफ्रंट
लव्ह लग्न लोचा या मालिकेतून रुचिता जाधव घराघरात पोहचली. मात्र तिने आपल्या कामाची सुरुवात जाहिरातीमधून केली होती. तिने माणूस एक माती, ‘मनातल्या’ उन्हात या चित्रपटांमध्येही काम केले आहे.