नात्यांच्या गोडव्याची & जरा हटके कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 13:22 IST2016-07-23T07:52:12+5:302016-07-23T13:22:12+5:30

       बेनझीर जमादार एखादी मंद झुळुक यावी आणि त्याने मन प्रफुल्लित व्हावे, असे चित्रपट सध्या कमीच. क्लायमॅक्समध्ये ...

Sweet and tactful stories of relationships | नात्यांच्या गोडव्याची & जरा हटके कहाणी

नात्यांच्या गोडव्याची & जरा हटके कहाणी

ong>       बेनझीर जमादार

एखादी मंद झुळुक यावी आणि त्याने मन प्रफुल्लित व्हावे, असे चित्रपट सध्या कमीच. क्लायमॅक्समध्ये एकदम काहीतरी नावीन्य अशा चित्रपटांची मानसिकता तयार झाली आहे. लव्हस्टोरीतही आपण काहीतरी संघर्ष शोधत असतो. परंतु, आयुष्य हे नेहमीच असे नसते; त्याशिवायही असते, हे दाखविणारी आणि नात्यांचा गोडवा जपणारी हटके कहाणी '& जरा हटके'या चित्रपटात पाहायला मिळते. 
लाइफस्टाइल बदलतीय, नवनवीन नाती जन्माला येण्याचा काळ आहे. या पार्श्‍वभूमीवर हा चित्रपट आला आहे. दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी या सगळ्या मांडणीमध्ये खूप संयम ठेवत एक चित्रकृती सादर केली आहे.मृणाल कुलकर्णी यांचा गोड अभिनय आणि त्याला सगळ्याच कलाकारांनी दिलेली साथ यामुळे हा चित्रपट एक वेगळा अनुभव ठरतो. आई-वडिलांचे दुसरे लग्न हा विषय नवीन नाही. 'खट्टा-मिठा'पासून 'गोलमाल-३'पर्यंत हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडला आहे. पण या नात्यांच्या वेळी होणारे मानसिक द्वंद मांडणारा हा चित्रपट आहे. 
              कॉलेजमध्ये एकत्र असणारी पुण्याची मीरा (मृणाल कुलकर्णी) व बंगालचा आकाश (इंद्रनील सेनगुप्ता) हे दोघे मित्र-मैत्रिणी जवळजवळ २0 वर्षांनंतर एकत्रित भेटतात. त्यांच्या या भेटीचे प्रेमात रूपांतर होते. या वेळी दोघांच्याही आयुष्यात बरंच काही घडून गेलेले असते. मीरा घटस्फोटित असते तर इंद्रनीलची पत्नीदेखील त्याला सोडून गेलेली असते. मीराला आस्था (शिवानी रांगोळे) आणि आकाशला निशांत (सिद्धार्थ मेनन) ही मुलं असतात. आपली ही मुले वयाच्या मध्यमवयात आपल्या या नात्यांचा स्वीकार करतील का? या विचाराने हे दोघे मुंबईला असणार्‍या आपल्या मुलांना एकमेकांना भेटायला सांगतात. आस्था आणि निशांत हे दोघे तर एकमेकांना भेटतात. पण त्यांची ही भेट अशीच पुढे रंगत जाते. पण बहीणभाऊ या नात्याने का आणखी काही? हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट तर नक्कीच पाहावा लागेल. त्याचबरोबर मीरा व आकाश यांची लव्हस्टोरीचेदेखील काय होते, अशा पद्धतीने नात्यांची हटके अशी कहानी जरा हटके या चित्रपटात पाहायला मिळेल. 
         बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता याच्या तोंडी मराठी ऐकून चित्रपटात कुठेही तो बंगाली अँक्सेन्ट जाणवला नाही. त्याचबरोबर मृणाल कुलकर्णी यांच्या अभिनयाला तर तोडच नाही. तसेच अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता सिद्धार्थ मेनन यांनीदेखील आपल्या अभिनयाने चित्रपटाची आशयघनता वाढविली आहे. छायांकन, वेशभूषा, पार्श्‍वसंगीताची देखील काळजी अत्यंत उत्तमरीत्या घेण्यात आली. 
          इरॉस इंटरनॅशनलने आतापर्यंत अनेक चांगले आशयघन चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. प्रेम करावे पण जरा हटके उपशीर्षकावरून बरेच काही सांगून जाणारी ही चित्रपटाची कथा आजच्या काळात न पटणारी असली तरी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास विचार करायला लावणारी आहे. नातेसंबधांना रुपेरी पडद्यावर अगदी संवेदनशीलपणे मांडणारे प्रकाश कुंटे यांनी चित्रपटातील कुटुंबाची हृदयस्पश्री कथा सुंदररीत्या सादर केली आहे.
      मिताली जोशी लिखित हा चित्रपट असून, यामध्ये मृणाल कुलकर्णी, इंद्रनील सेनगुप्ता, सिद्धार्थ मेनन, शिवानी रंगोले यांच्याबरोबरच मधुरा देशपांडे, सुहास जोशी यांच्यादेखील प्रमुख भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. 

Web Title: Sweet and tactful stories of relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.